इचलकरंजीत जनगणना २०२७ साठी क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण सुरू
इचलकरंजी:
जनगणना २०२७ अंतर्गत होणाऱ्या घरगणनेच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेत क्षेत्रीय प्रशिक्षकांच्या तीन दिवसीय प्रशिक्षणाला गुरुवारी सुरुवात झाली. मनपा सभागृहात झालेल्या या प्रशिक्षणाचे उद्घाटन आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते झाले.
केंद्रीय जनगणना संचालनालयाच्या नियोजनानुसार दि. १६ मे ते १४ जून या कालावधीत शहरात घरगणना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी १० क्षेत्रीय प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, शहरातील महाविद्यालयांतील प्राध्यापकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी जनगणना प्रक्रियेची ओळख, कायदेशीर बाबी आणि प्रशिक्षण पद्धती यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जनगणनेतील संकल्पना, व्याख्या आणि माहिती संकलनातील अचूकतेवर विशेष भर देण्यात आला. सहभागींसोबत प्रभावी संवाद साधण्याच्या पद्धतीही स्पष्ट करण्यात आल्या.
दुपारच्या सत्रात HLB सीमारेषांचे पडताळणी (ग्राउंड ट्रुथिंग) व लेआउट मॅप तयार करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच HLB मोबाइल अॅपची स्थापना व वापर याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
यावेळी शहर जनगणना अधिकारी नंदू परळकर, जनगणना संचालनालयाचे समन्वयक मुकेशकुमार उपस्थित होते. प्रशिक्षणात मास्टर ट्रेनर म्हणून महम्मद इरफान पटेल, प्रा. नागावकर आणि विजय राजापुरे यांनी मार्गदर्शन केले.
आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी पल्लवी पाटील यांनी प्रशिक्षकांनी आगामी प्रशिक्षण सत्रे प्रभावीपणे पार पाडून जनगणनेचे काम यशस्वी करण्याचे आवाहन केले.
जनगणना प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना आयुक्त पल्लवी पाटील व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






