विजसवलत ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ द्या; पॉवरलूम असोसिएशनची मागणी
इचलकरंजी:
यंत्रमाग उद्योगासाठी सुरू असलेल्या वीज सवलतीच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी दि. इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे नागपूर येथील वस्त्रोद्योग आयुक्त मा. संजय दैने यांना देण्यात आले.
दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून यंत्रमाग उद्योगासाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची करण्यात आली होती. त्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत यंत्रमागधारकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक जाचक अटींमुळे अर्ज पूर्ण करणे कठीण जात असल्याची तक्रार होती.
या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून वस्त्रोद्योग मंत्री मा. संजय सावकारे यांच्याकडे अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मंत्रालयात तीन बैठका पार पडून सुधारित व सुटसुटीत ऑनलाईन अर्ज दि. ७ एप्रिल २०२६ रोजी उपलब्ध करून देण्यात आला.
मात्र, इचलकरंजीत सुमारे १०,८०० यंत्रमागधारक असून त्यापैकी अनेकांची नोंदणी अद्याप बाकी आहे. उर्वरित १५ दिवसांत सर्वांची नोंदणी पूर्ण करणे शक्य नसल्याने सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, जे यंत्रमागधारक पोर्टलवर नोंदणी करून यु.आ.डी. क्रमांक प्राप्त करतील, त्यांची वीज बिल सवलत अंतिम मंजुरी प्रलंबित असल्यामुळे बंद करू नये, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या वेळी सहआयुक्त गणेश वंडकर, प्रादेशिक उपायुक्त सौ. उज्वला पळसकर उपस्थित होते. तसेच असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, सोमाण्णा वाळकुंजे, चंद्रकांत भोपळे, पांडूरंग सोलगे, दत्तात्रय टेके, किरण पोवार, राजाराम गिरी आदी उपस्थित होते.
वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांना निवेदन देताना चंद्रकांत पाटील व पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






