यंत्रमाग वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीला दोन महिन्यांची मुदतवाढ
इचलकरंजी, २८ :
यंत्रमाग उद्योगासाठी वीज बिल सवलत सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन नोंदणीस दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली. त्यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची मंत्रालयात भेट घेऊन ही मागणी मांडली होती.
राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने २७ ऑक्टोबर २०२५ रोजी यंत्रमागधारकांसाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची केली होती आणि त्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली होती. मात्र, अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी, जाचक अटी आणि मोठ्या संख्येतील यंत्रमागधारक यामुळे दिलेल्या कालावधीत नोंदणी पूर्ण करणे शक्य होत नव्हते. याबाबत इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने मुदतवाढीची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर मंत्री सावकारे यांनी दोन महिन्यांची मुदतवाढ मंजूर केली आहे. दरम्यान, या कालावधीत सर्व यंत्रमागधारकांनी नोंदणी पूर्ण करणे आवश्यक असून, अन्यथा वीज बिलातील सवलत बंद होणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मंत्री संजय सावकारे यांच्याकडून मुदतवाढीचे पत्र स्वीकारताना आ.राहुल आवाडे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





