DHIS गुणांकनात इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाची राज्यात चौथी झेप
इचलकरंजी:
जिल्हा आरोग्य माहिती व्यवस्थापन (DHIS Ranking) अंतर्गत माहे फेब्रुवारी २०२६ साठी जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुणांकनात इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजीने उल्लेखनीय कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला आहे. १०० पैकी ६९ गुण मिळवत २०० खाटांचे हे रुग्णालय ५०० व ३०० खाटांच्या मोठ्या रुग्णालयांशी स्पर्धा करत अव्वल स्थानावर झेपावले आहे.
या गुणांकनामध्ये रुग्ण सेवा, बाह्य व आंतर रुग्ण सेवा, विविध प्रतिबंधक कार्यक्रम, माता-बाल संगोपन, कुटुंब कल्याण, प्रसूती व स्त्रीरोग सेवा, शस्त्रक्रिया, औषध उपलब्धता तसेच प्रयोगशाळा चाचण्या आदी विविध निकषांवर आधारित मूल्यांकन करण्यात येते.
यापूर्वी सहावा-सातवा क्रमांक मिळवणाऱ्या या रुग्णालयाने गेल्या सहा-सात महिन्यांत केलेल्या सुधारणा आणि सेवावृद्धीमुळे यंदा चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या यशाबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष पोळ यांनी आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याबद्दल आभार मानले.
तसेच या सांघिक यशात बाह्य संपर्क अधिकारी डॉ. अमित सोहनी, डॉ. प्रकाश मोरे, डॉ. मानसी, डॉ. आशिष घाटगे, डॉ. रामचंद्र लवटे, मेट्रन श्रीमती चारुशील्पा यमल यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा, एक्स-रे, सोनोग्राफी विभागातील कर्मचारी तसेच प्रशासकीय व गट-ड कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी नमूद करत सर्वांचे अभिनंदन केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





