ICHMH51NEWS.IN
9921600800

राष्ट्रीय साखर तंत्रज्ञ असोसिएशनच्या कौन्सिल सदस्यपदी मनोहर जोशी यांची बिनविरोध निवड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय साखर तंत्रज्ञ असोसिएशनच्या कौन्सिल सदस्यपदी मनोहर जोशी यांची बिनविरोध निवड

इचलकरंजी –
साखर उद्योगातील देशातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठित तांत्रिक संस्था असलेल्या ‘द शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (STAI) नवी दिल्लीच्या कौन्सिल सदस्यपदी सन २०२६ ते २०२९ या त्रैवार्षीक कालावधीकरिता  मनोहर गोपाळ जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. श्री. जोशी हे हुपरीतील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत.
या निवडीद्वारे मनोहर जोशी हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गोवा या पाच राज्यांचा समावेश असलेल्या ‘रिजन ३.३.५’ चे प्रतिनिधित्व करणार आहेत. साखर उद्योगातील तांत्रिक आधुनिकीकरण, धोरण निश्चिती आणि संशोधनामध्ये या रिजनचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
१९२५ मध्ये स्थापन झालेली ही साखर उद्योगातील व्यावसायिकांची संस्था आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची मान्यता लाभलेली ही संस्था साखर उत्पादन, अभियांत्रिकी, शेती आणि उप-उत्पादने या विषयांत जागतिक स्तरावर कार्यक्षमपणे कार्य करते.
मनोहर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने आधुनिकीकरण आणि बगॅस व ऊर्जा बचतीत केलेले प्रयोग पथदर्शक ठरले आहेत. यामुळे जवाहर साखर कारखान्याने तंत्रज्ञान आणि कार्यक्षमतेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार पटकावले आहेत. त्यांच्या याच तांत्रिक अनुभवाचा लाभ आता देशातील पाच राज्यांतील साखर कारखान्यांना होणार आहे.
असोसिएशनची ८८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पहिली कौन्सिल मीटिंग येत्या १९ ऑगस्ट २०२६ रोजी गोवा येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक बैठकीत श्री. जोशी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारतील आणि साखर उद्योगाकरिता आगामी तीन वर्षांचा विकासाचा अजेंडा निश्चित करतील.
‘ही निवड म्हणजे महाराष्ट्रातील साखर तंत्रज्ञांनी माझ्यावर टाकलेला मोठा विश्वास आहे. आगामी काळात साखर उद्योगाला अधिक कार्यक्षम बनवणे, बायो-रिफायनरी मॉडेलला गती देणे आणि तांत्रिक क्रांतीद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकणे ही माझी प्राथमिकता राहील असे मत श्री. जाशी यांनी निवडीच्या निमित्ताने व्यक्त केले.
या निवडीबद्दल जवाहर साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, संचालक मंडळ आणि साखर उद्योगातील मान्यवरांकडून श्री. जोशी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा