शहापूर परिसरातील नगरसेवकांचा पाण्यासाठी आक्रमक मोर्चा
इचलकरंजी :
शहापूर प्रभाग क्रमांक २ मधील तीव्र पाणीटंचाईविरोधात नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उसळला. बालाजी चौकातून काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात महिलांचा मोठा सहभाग होता. “देशात सत्ता, राज्यात सत्ता… गावात सत्ता, पाणी बेपत्ता” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. चार ते पाच दिवसांनी होणारा अपुरा व कमी दाबाचा पाणीपुरवठा यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून महिला, जेष्ठ नागरिक, लहान मुले व कामगार वर्गाला मोठा फटका बसत आहे.
नागरिकांनी आयुक्त व महापौरांकडे सादर केलेल्या निवेदनात सुळकुड पाणी योजना मंजूर होऊनही अंमलबजावणी रखडल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.१६१ कोटींच्या या योजनेला अमृत-२ अंतर्गत मान्यता मिळूनही प्रत्यक्ष कामाची गती दिसत नसल्याचा आरोप करण्यात आला. शहरात २०७ बोअरवेल्स उभारल्याचा गाजावाजा करण्यात आला असला तरी त्यातून अपेक्षित पाणीपुरवठा होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. कृष्णा व वारणा पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधींचा खर्च करूनही पाइपलाईन गळती,अपुरी देखभाल आणि वितरणातील असमतोल यामुळे पाणीपुरवठा बेभरवशाचा ठरत असल्याचे नागरिकांनी नमूद केले.
या आंदोलनात नगरसेवक रणजीत गंगाराम जाधव, परवेज लतीफ गैबान, सौ. पद्मा लक्ष्मण सावरतकर, कु. यास्मिन मुसा तासगावे, श्री. इम्रान बशीर हावेरी, गटनेते उदयसिंग पाटील तसेच नगरसेवक शिवाजी पाटील यांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.
नगरसेवक रणजीत जाधव यांनी “पाणीप्रश्नी प्रशासनाशी दोन हात करणारा लोकप्रतिनिधी निर्माण झाला नाही, हे इचलकरंजीकरांचे दुर्दैव” असे सांगितले.
परवेज गैबान यांनी “मोर्चा घेऊन आलेल्या नागरिकांसाठी महापालिकेचे दरवाजे बंद ठेवणे हा लोकशाहीचा अपमान” असल्याची टीका केली.
नागरिकांनी दररोज नियमित पाणीपुरवठा, शहापूरसाठी स्वतंत्र आराखडा व वेळापत्रक, २०७ बोअरवेल्सचा अहवाल सार्वजनिक करणे, सुळकुड व वारणा योजनांचा प्रगती अहवाल जाहीर करणे आणि पाइपलाईन गळती तातडीने दुरुस्त करणे या ठोस मागण्या केल्या.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असून, कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

मोर्चात सहभागी नगरसेवक व नागरिक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






