यंत्रमागधारकांकडून ऑनलाईन नोंदणी रद्द करण्याची मागणी
इचलकरंजी :
राज्य सरकारकडून वीज सवलत योजनेसाठी सक्तीची करण्यात आलेली ऑनलाईन नोंदणी रद्द करावी, अशी मागणी यंत्रमागधारक जागृती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आमदार राहुल आवाडे यांना देण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, वस्त्रोद्योग हा शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा व्यवसाय असून, अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडून सवलतीच्या दरात वीज पुरवठा केला जात आहे. मात्र, सध्या विविध अडचणींमुळे हा उद्योग संकटात सापडला आहे.
अशा परिस्थितीत वीज सवलतीसाठी १२ प्रकारची कागदपत्रे सादर करून ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इचलकरंजीतील वस्त्रोद्योग १९०४ पासून परंपरागत पद्धतीने सुरू असल्याने अनेक ठिकाणी वीज कनेक्शन, शेड आणि मशिनरी वेगवेगळ्या नावांवर आहेत किंवा व्यवसाय भाडेतत्त्वावर चालवला जातो. त्यामुळे ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे अनेक व्यावसायिकांसाठी अडचणीचे ठरत आहे.
तसेच, सर्व कागदपत्रे पूर्ण असलेल्या व्यावसायिकांनाही ऑनलाईन नोंदणी करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे. प्रक्रिया अत्यंत किचकट असल्यामुळे शहरातील बहुतांश यंत्रमागधारकांनी अद्याप नोंदणी केलेली नाही.
यापूर्वी या संदर्भात चर्चा झाल्यानंतर साध्या पद्धतीने, एकाच पानावर गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करता येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात प्रक्रिया जटिल असल्याने ती रद्द करून यंत्रमागधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
यावेळी अध्यक्ष विनय महाजन, सुरज दुबे, अशोक बुगड,भानुदास वीर,कमल तिवारी, विनायक जोशी, मोहन ढवळे, उमेश लाड, प्रविण कदम, महेश दुधाणे, मनोज दाते, सचिन कांबळे, दिपक बांबरे, राहुल चिखलगे, शितल डोंगरे, प्रशांत आळंदे, सचिन मांगलेकर, संदीप आवटे, अनिकेत लोले उपस्थित होते
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







