यंत्रमागधारक संकटाच्या खाईत; 27 अश्वशक्तीवरील विज बिलवाढीने वाढली चिंता-विनय महाजन
इचलकरंजी:
आधीच विविध आर्थिक व औद्योगिक संकटांना सामोरे जात असलेल्या यंत्रमाग उद्योगास आता विज दरवाढीचा आणखी एक मोठा फटका बसला आहे. 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांच्या विज बिलामध्ये प्रति युनिट सुमारे 50 ते 60 पैशांची वाढ झाल्याने कारखानदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नामुळे अनेक प्रोसेस उद्योग बंद आहेत. त्याचबरोबर सूत दरामध्ये प्रति किलो 80 ते 90 रुपयांची वाढ झाली आहे. वहिफणी दरवाढीच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू असून, खर्चीवाल्या यंत्रमागधारकांची गेली 13 वर्षे मजुरी वाढ न झाल्याने स्वतंत्र आंदोलन उभे राहिले आहे. याशिवाय विज बिल सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची करण्यात आल्याने छोट्या व मध्यम यंत्रमागधारकांना अतिरिक्त अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या सर्व संकटांच्या मालिकेत आता विज बिलवाढीची भर पडल्याने “यंत्रमाग व्यवसाय चालवायचा की बंद करायचा?” अशी मानसिकता अनेक कारखानदारांची झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे.
विशेषतः अत्याधुनिक यंत्रमागधारकांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 24 एअरजेट यंत्रमाग असलेल्या कारखानदारांना दरमहा सुमारे एक ते दीड लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त विज बिलाचा भार सहन करावा लागू शकतो, असे सांगण्यात येत आहे.
यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. “वेळीच उपाययोजना न झाल्यास संपूर्ण वस्त्रोद्योग कोलमडून बंद पडेल आणि इचलकरंजीची ‘महाराष्ट्राची मँचेस्टर’ ही ओळख धोक्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








