सुळकुड पाणी योजनेसाठी शिव-शाहू विकास आघाडीचे खासदार धैर्यशील माने यांना निवेदन,खासदारांचे मुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांकडे बैठक लावण्याचे आश्वासन
इचलकरंजी :
शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त सुळकुड उद्भव पाणी योजना तात्काळ कार्यान्वित करण्यात यावी, या मागणीसाठी इचलकरंजी महानगरपालिकेतील शिव-शाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी हातकणंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले.
यावेळी शहरातील तीव्र पाणीटंचाई, नागरिकांना होत असलेला मनस्ताप तसेच मंजूर असूनही योजना रखडल्याबाबत चर्चा करण्यात आली. योजनेला तांत्रिक मान्यता मिळालेली असूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सुळकुड पाणी योजना तात्काळ कार्यान्वित व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने आणि उपोषणे केली आहेत. दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या उपोषणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
तसेच दि. ०८ ऑगस्ट २०२४ रोजी तांत्रिक समितीने सादर केलेल्या अहवालाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दि. २९ मार्च २०२५ रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दि. १५ एप्रिल २०२५ पर्यंत कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले होते. मात्र जवळपास १३ महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
शहराच्या पाणी प्रश्नावर गेल्या अनेक वर्षांपासून केवळ बैठका, घोषणा आणि आश्वासने दिली जात असून राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे मंजूर झालेल्या अनेक योजना रखडल्या किंवा रद्द झाल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला. सर्व राजकीय नेत्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सुळकुड पाणी योजनेचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत असल्याचे सांगण्यात आले.
इचलकरंजी शहरातील वाढती पाणी समस्या लक्षात घेता खासदार धैर्यशील माने यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक आयोजित करावी आणि सुळकुड पाणी योजना त्वरित मार्गी लावावी, अशी मागणी शिव-शाहू विकास आघाडीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील, शिवसेना (उबाठा) गटनेते नगरसेवक शिवाजी पाटील, संजय कांबळे, रणजीत जाधव, संजय तेलनाडे, सयाजी चव्हाण, सुनील तेलनाडे, सचिन राणे, नंदकुमार पाटील, इमरान हावेरी, पुंडलिक जाधव, नितीन कोकणे, अब्राहम आवळे, राजू आलासे, गणेश सावरतकर, वाजीद तासगावे, रतन वाझे तसेच नगरसेविका स्वाती लोखंडे, यास्मिन तासगावे, पद्मा सावरतकर, क्रांती आवळे, संगीता आलासे, स्मिता तेलनाडे आदी उपस्थित होते.
तातडीने बैठकीसाठी प्रयत्न-खा. धैर्यशील माने
खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी उपस्थितांना आश्वासन देताना सांगितले की, इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नाबाबत मुख्यमंत्री तसेच नगरविकास मंत्री यांच्याकडे लवकरच वेळ घेऊन तातडीची बैठक आयोजित करण्यात येईल. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सुळकुड उद्भव पाणी योजनेबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खा.धैर्यशील माने यांना निवेदन देत असताना शिव शाहु विकास आघाडीचे नगरसेवक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





