इचलकरंजी एसटी स्थानकावर महिलेच्या पर्समधून ६५ हजारांचे सोन्याचे गंठण लंपास.
इचलकरंजी :
इचलकरंजी येथील एसटी स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधून सुमारे ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अन्नपूर्णा विजय नलवडे (वय ४०, रा. आण्णा रामगोंडा शाळेमागे, इचलकरंजी) या आपल्या माहेरी जयसिंगपूर येथे जाण्यासाठी ३१ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास इचलकरंजी एसटी स्थानकातील फलक क्रमांक ४ येथे उभ्या असलेल्या मिरज बसमध्ये चढत होत्या. यावेळी बसमध्ये मोठी गर्दी होती.
गर्दीतून बसमध्ये प्रवेश करत असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले सुमारे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरून नेले. या गंठणाची किंमत सुमारे ६५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पो हे कॉ. माळी अधिक तपास करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





