ICHMH51NEWS.IN
9921600800

कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा झेंडा एकट्याने खांद्यावर वाहत राहिलेला कार्यकर्ता-सुरेश हाळवणकर 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा झेंडा एकट्याने खांद्यावर वाहत राहिलेला कार्यकर्ता-सुरेश हाळवणकर 

एका यंत्रमाग कामगाराच्या घरात जन्मलेला मुलगा… कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा झेंडा एकट्याने खांद्यावर वाहत राहिलेला कार्यकर्ता… आणि दोन वेळा भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष,प्रदेश सरचिटणीस तसेच लोकांचा विश्वास संपादन करून आमदार झालेला लढवय्या नेता — सुरेश गणपती हाळवणकर यांचा आज, २ जून रोजी, वाढदिवस.

वडील गणपती हाळवणकर हे इचलकरंजीतील यंत्रमाग कामगार. शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या हाळवणकर साहेबानी सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी नाते जडवले. एका यंत्रमाग कामगाराच्या घरातील मुलाला कै.रामभाऊ राशिनकर यांनी  विश्व हिंदू परिषद च्या माध्यमातून कामास सुरू करण्यास सांगितले, हाळवणकर साहेब यांनी संघाचे संस्कार घेत, वैचारिक बैठक पक्की करत भारतीय जनता पक्षाशी जोडून घेतले — आणि एक दिवस इचलकरंजीसारख्या बालेकिल्ल्यात भाजपचे पाय रोवले. हीच त्यांची खरी ओळख.

१९८० ते २०१४ हा काळ म्हणजे कोल्हापूर-सांगली परिसरात भारतीय जनता पक्षासाठी जणू वैराण वाळवंट होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रदेशावर अभेद्य वर्चस्व गाजवले होते. अशा परिस्थितीत सुरेश हाळवणकर साहेब हे कुरुक्षेत्रावर एकट्याने उभे राहिलेल्या अभिमन्यूसारखे होते — सभोवती शत्रूचे व्यूह, तरीही लढण्याची जिद्द कायम. रोज नव्या शक्तिपीठापाशी जाऊन बळ मागावे, तसे ते संघाच्या विचारांतून बळ घेत एकट्याने जिल्हाभर भाजपचा विस्तार करत राहिले. *कोल्हापूर जिल्ह्यातून लोकांनी थेट निवडून दिलेले ते पहिलेच भाजप आमदार ठरले*.

सन २००९ मध्ये इचलकरंजी मतदारसंघातून प्रथमच विजयी झाल्यानतर मोठमोठ्या पदांच्या मागे न लागता कोल्हापूर जिल्ह्यात संघटना बांधणीला वाहून घेतले. त्याचे फळ म्हणून २०१४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून दोन आमदार निवडून आले आणि भाजप जिल्ह्यातील सर्व जागा लढू शकला — हे कुणाच्या तरी अथक श्रमाचे मूक उत्तर होते.

अनेक राजकारणी आमदार झाल्यावर साखर कारखाने, सूतगिरण्या, संस्था स्थापन करण्यासाठी आपले पद वापरतात. हाळवणकर साहेबांनी मात्र उलटी वाट चोखाळली. त्यांनी इचलकरंजीच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वस्तीत रस्ते, पाण्यासाठी बोअर, फूटपाथ, रिंगरोड, डीपी रोड यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी झटले. शेकडो किलोमीटर रस्ते आणि नागरी सुविधा त्यांच्या काळात उभ्या राहिल्या. नगरपालिकेला शिस्त लागली. शहरात डिजिटल फलकांचे बेसुमार युद्ध सुरू होते — ते त्यांच्याच पुढाकाराने बंद झाले. याच कार्यशैलीमुळे इचलकरंजीच्या जनतेने त्यांची तुलना थेट कॉम्रेड के.एल. मलाबादे यांच्याशी करायला सुरुवात केली— आणि ती तुलना म्हणजे साधी गोष्ट नाही.

वस्त्रोद्योग हा इचलकरंजीचा जीव असून या उद्योगाला धोरणाअभावी मरणप्राय वेदना सहन कराव्या लागत होत्या. साहेबानी विधिमंडळात प्रश्न, लक्षवेधी सूचना, खाजगी ठराव यांसारख्या आयुधांचा प्रभावी वापर करून वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यास सरकारला भाग पाडले. यंत्रमाग कामगारांना मजुरीवाढ, वीज सवलत मिळवून दिली — हे करताना त्यांच्या मनात कदाचित त्यांचे वडीलही असतील.

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची भूमिका केवळ मतदारसंघापुरती मर्यादित राहिली नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार राजू शेट्टी यांना निवडून आणण्यात हाळवणकर साहेब यांचा मोलाचा वाटा होता — हे स्वतः शेट्टी यांनी सांगितले आहे. मात्र नंतर राजू शेट्टी यांनी भाजपशी फारकत घेतल्यावर पक्षसंस्कार आणि विचारनिष्ठेला जागत हाळवणकर साहेब त्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहिले, आणि त्यांचा पराभव घडवण्यातही आघाडीवर होते. नंतर खासदार धैर्यशील माने यांनीही अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे की, त्यांच्या विजयाचे खरे शिल्पकार सुरेश हाळवणकर आहेत. हे सारे सांगते की हाळवणकर साहेब केवळ मतदारसंघाचे आमदार नव्हते — ते संपूर्ण प्रदेशाचे विश्वासू आधारस्तंभ होते.

राजकारणात विचार बदलणे हे फॅशन झाले असताना, सुरेश हाळवणकर साहेब यांनी एकदा स्वीकारलेला विचार आजतागायत सोडलेला नाही. संघ आणि भाजपच्या विचारांशी ते आजही तितकेच बांधील आहेत. “सोने आगीत तापले तरी सोनेच राहते” — याप्रमाणे पराभव, उपेक्षा, अन्याय सहन करूनही त्यांनी पक्षांतर केले नाही. हीच प्रामाणिकता त्यांना कार्यकर्त्यांच्या मनात अढळ स्थान देते. गेल्या दहा वर्षांत त्यांच्याकडे पद नसतानाही कार्यकर्त्यांची संख्या वाढतच राहिली — नुकत्याच झालेल्या इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठे यश आले, हे त्याचेच प्रत्यंतर आहे.

आज एक विचित्र विरोधाभास इचलकरंजीच्या राजकारणात दिसतो. जो माणूस दशकांपासून भाजपसाठी एकट्याने झुंजत राहिला, त्याला उमेदवारी नाकारण्यात आली.बाहेरून आलेल्यांना तिकीट, घरचे दिवे अंधारात— हे चित्र पाहून कार्यकर्त्यांच्या मनात जी सल आहे, ती समजण्यासारखी आहे. विधानपरिषदेचे वचन दिले, पण ते अद्याप पूर्ण झालेले नाही.

सुरेश हाळवणकर साहेब यांचे अनेक विरोधकच आज त्यांच्या पक्षात आहेत — यापेक्षा मोठा वैचारिक विजय तो काय असतो? पण याच क्षणी भाजपने त्यांना दिलेले वचन पाळणे, ही पक्षाच्या विश्वासार्हतेची कसोटी आहे. जे कार्यकर्ते अनेक दशके कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता पक्षासाठी झटत राहतात, त्यांच्याशी पक्ष कसा वागतो — याचे उत्तर सुरेश हाळवणकर साहेब यांच्या भवितव्यातून मिळेल.आज वाढदिवसाच्या निमित्ताने एकच प्रार्थना — या *एकनिष्ठ सैनिकाला दीर्घायुष्य लाभो*, त्यांच्या निष्ठेला न्याय मिळो, आणि भाजपने आपले वेगळेपण सिद्ध करावे, हीच अपेक्षा.

राजु भाकरे

मा.विस्तारक,भाजपा इचलकरंजी विधानसभा

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा