एसटीचा ७८ वा वर्धापनदिन उत्साहात; चालक-वाहकांचा गौरव, वृक्षारोपणाने दिला पर्यावरणाचा संदेश
इचलकरंजी:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त इचलकरंजी आगारात विविध उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शिवतीर्थ मध्यवर्ती बसस्थानक, हातकणंगले बसस्थानक आणि वडगाव बसस्थानक येथे अधिकारी, कर्मचारी व प्रवाशांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले.
वर्धापनदिनानिमित्त बसस्थानक परिसराची रांगोळी, फुलांच्या माळा आणि रोषणाईने आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी एसटी बसचे पूजन करण्यात आले. तसेच प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे प्रवाशांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
शिवतीर्थ मध्यवर्ती बसस्थानक येथे उत्कृष्ट केपीटीएल मिळवून देणाऱ्या चालकांचा तसेच उत्कृष्ट उत्पन्न आणणाऱ्या वाहकांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल त्यांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
याचबरोबर एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शिवतीर्थ मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
कार्यक्रमास आगारातील अधिकारी, पर्यवेक्षक, कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसटीच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देत वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
एसटी चा ७८ वा वर्धापनदिन साजरा करताना अधिकारी व कर्मचारी वर्ग
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





