ICHMH51NEWS.IN
9921600800

खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीचा प्रश्न अखेर निकाली ५२ पिकास २६ पैसे मजुरीवाढीवर करार; माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या मध्यस्थीने तोडगा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीचा प्रश्न अखेर निकाली

५२ पिकास २६ पैसे मजुरीवाढीवर करार; माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या मध्यस्थीने तोडगा

इचलकरंजी:
 गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीच्या आंदोलनाला अखेर सोमवारी यश आले. यंत्रमागधारकांचे प्रतिनिधी आणि ट्रेडिंग असोसिएशन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ५२ पिकास २६ पैसे मजुरीवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या मध्यस्थीमुळे हा तोडगा निघाल्याचे सांगण्यात आले.
गेल्या १३ वर्षांपासून खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना मजुरीवाढ मिळालेली नव्हती. वाढती महागाई, उत्पादन खर्चातील वाढ आणि उद्योगातील आर्थिक अडचणी यामुळे यंत्रमाग व्यवसाय संकटात सापडला होता. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पावरलूम असोसिएशन, जागृती यंत्रमागधारक संघटना, शिवसेना प्रणित यंत्रमागधारक संघटना, खर्चीवाला यंत्रमागधारक संघटना तसेच साधे यंत्रमागधारक संघटना यांनी मजुरीवाढीसाठी आंदोलन छेडले होते.
या प्रश्नावर यापूर्वी प्रांत कार्यालयात दोन वेळा बैठका घेण्यात आल्या होत्या. मात्र त्यातून कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता. दरम्यान, २३ मे रोजी झालेल्या बैठकीत माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी यंत्रमागधारकांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करत ८ जूनपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.
त्याअनुषंगाने सोमवारी सकाळी हाळवणकर यांच्या कार्यालयात दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत प्रचलित मजुरीमध्ये अर्धा पैसा वाढ करून ५२ पिकास २६ पैसे असा दर निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सर्व प्रतिनिधींनी प्रांत कार्यालयात जाऊन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्यासमोर झालेल्या समझोत्याची माहिती दिली. दोन्ही बाजूंची भूमिका ऐकल्यानंतर अधिकृत करार करण्यात आला.
करारानुसार ही मजुरीवाढ पुढील तीन वर्षांसाठी लागू राहणार असून त्यानंतर नव्याने चर्चा करून करार अथवा पुढील वाढ निश्चित करण्यात येणार आहे.
बैठकीस यंत्रमागधारकांचे प्रतिनिधी पुंडलिकराव जाधव, विश्वनाथ मेटे, शहाजी भोसले, नंदकुमार लोखंडे, धर्मराज जाधव, रावसाहेब तिपे तसेच ट्रेडिंग असोसिएशनचे अध्यक्ष रामपाल भंडारी, चंदनमल मंत्री, ओमजी दरक, ओमप्रकाश काबरा आणि तुळशीराम खंडेलवाल उपस्थित होते.
दरम्यान, मजुरीवाढीच्या बैठकीची माहिती मिळताच अनेक यंत्रमागधारक व महिला कारखानदार प्रांत कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि दोन दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

सुरेशराव हाळवणकर यांची यशस्वी शिष्टाई.

यंत्रमागधारकांचा संप मिटावा आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर त्यांना न्याय मजुरी मिळावी यासाठी माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी गेल्या आठवडाभर सातत्याने दोन्ही बाजूंमध्ये समन्वय साधला. त्यांनी सुचविलेला ५२ पिकास २६ पैसे मजुरीवाढीचा फॉर्म्युला अखेर दोन्ही बाजूंनी मान्य केल्याने आंदोलनाची सांगता झाली.

मागणी पाच पैशाची तोडगा अर्ध्या पैशावर..

खर्चीवाले यंत्रमागधारकांनी पाच पैशाची मागणी चालू करून २३ दिवस आंदोलन केले होते, यापूर्वी प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत किमान ५२ पिकास ७८ पैशापर्यत कशी मजुरीवाढ देता येईल याबाबत चर्चाही झाली होती मात्र युद्धजन्य परिस्थिती,इचलकरंजी सह पाली बालोत्रा प्रोसेस बंद अशा स्थितीत 
मजुरीवाढीचा विषय अर्ध्या पैशावर आल्याने काही कारखानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आता मजुरीवाढीच्या आशेवर इतर घटकांचे समाधान अर्ध्या पैशात कसे कसे करायचे याबाबात चर्चा यंत्रमागधारक करत होते.

प्रांत कार्यालयात बैठकीदरम्यान प्रांताधिकारी दिपक शिंदे,माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, ट्रेडिंगधारक व यंत्रमागधारक प्रतिनिधी.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा