शाहू पुतळा चौकातील खाद्यपदार्थ गाड्यांवर महापौरांचा धडक कारवाईचा इशारा
“सोयी देतोय, मग नियम मोडण्याचे कारण काय?” – उदय धातूंडे यांचा संतप्त सवाल
इचलकरंजी :
पंचवटी टॉकीज परिसरात फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देऊनही शाहू पुतळा चौकात पुन्हा खाद्यपदार्थांच्या हातगाड्या उभ्या राहिल्याने महापौर उदय धातूंडे यांनी रविवारी आक्रमक पवित्रा घेत संबंधितांना चांगलेच धारेवर धरले. भर पावसात स्वतः घटनास्थळी पोहोचलेल्या महापौरांनी तातडीने गाड्या हटविण्याचे आदेश देत, घेतलेल्या निर्णयाला हरताळ फासण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला.
महानगरपालिकेच्या वतीने पंचवटी टॉकीजजवळ फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याठिकाणी आवश्यक सुविधा देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अचानक शाहू पुतळा परिसरात पुन्हा खाद्यपदार्थांच्या गाड्या लागल्याचे निदर्शनास आले. याची माहिती मिळताच महापौर धातूंडे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी फेरीवाल्यांनी, मक्तेदाराकडून रॅम्पचे काम पूर्ण झाले नसल्याने तसेच बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आजच्या दिवसापुरत्या गाड्या लावल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र हे स्पष्टीकरण महापौरांना मान्य झाले नाही. “सर्व सुविधा देण्याचे आश्वासन दिले असताना कोणाच्या परवानगीने आणि कोणाच्या सांगण्यावरून हा निर्णय घेण्यात आला?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
“माझ्या निदर्शनास न आणता घेतलेले निर्णय मोडण्याचा प्रयत्न होत असेल तर तो सहन केला जाणार नाही. शहरातील वाहतूक आणि नागरिकांच्या सोयीचा विचार करूनच पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक खोडसाळपणा करू नये,” असे स्पष्ट शब्दांत महापौरांनी सुनावले.
तसेच फेरीवाल्यांच्या अडचणी लक्षात घेऊन रॅम्पची सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. “दिलेला शब्द पाळणे हे माझ्यासाठी पदापेक्षा महत्त्वाचे आहे. फेरीवाल्यांना कोणताही अन्याय होऊ देणार नाही, मात्र नियमांचे पालन सर्वांनाच करावे लागेल,” असेही धातूंडे यांनी सांगितले.
दरम्यान, फेरीवाले नेते दीपक पाटील यांनी उपमहापौर तसेच संबंधित विभागांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रार केली. बांधकाम विभाग आणि मक्तेदारांकडून कामात विलंब होत असल्याने फेरीवाल्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौरांच्या आक्रमक भूमिकेनंतर शाहू पुतळा चौकातील खाद्यपदार्थांच्या गाड्या हटविण्यात आल्या असून, पर्यायी ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
फेरीवाल्यांशी चर्चा करताना महापौर उदय धातूंडे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









