दोन महिन्यांपूर्वी नगरसेविकेच्या निवेदनाकडे दुर्लक्ष; घरात पाणी शिरल्यानंतर प्रशासनाला जाग
इचलकरंजी :
शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या समस्येबाबत तब्बल दोन महिन्यांपूर्वी दिलेल्या निवेदनाकडे महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची वेळ आली. पहिल्याच जोरदार पावसानंतर परिस्थिती गंभीर बनल्याने परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्वामी मळा, चौगुले घर ते बागरे घर परिसर तसेच कोले मळा भागात रस्त्याची उंची कमी झाल्याने आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने दरवर्षी पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. यंदाही हीच समस्या उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन नगरसेविका वैशाली मोहिते यांनी ३० एप्रिल २०२६ रोजी महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
निवेदनात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही.
दरम्यान, अलीकडे झालेल्या पावसात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि काही नागरिकांच्या घरातही पाणी शिरले. त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका थेट नागरिकांना बसल्याची भावना व्यक्त होत आहे. आयुक्त आणि बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात कामे होत नाहीत.
विशेष म्हणजे नागरिकांसह लोकप्रतिनिधींना आयुक्तांची भेट घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागतात. अनेकदा “आयुक्त बैठकीत आहेत” किंवा “व्यस्त आहेत” अशी कारणे देत भेट नाकारली जात असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनाच प्रतिसाद मिळत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे कितपत गांभीर्याने पाहिले जात असेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पावसामुळे परिस्थिती गंभीर झाल्यानंतर महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः संबंधित भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. मात्र समस्या निर्माण होण्यापूर्वीच दोन महिन्यांपूर्वी सूचना देऊनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. “प्रत्येक वेळी समस्या उद्भवल्यानंतरच प्रशासन जागे होते,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून पावसाच्या पाण्याचा निचरा, रस्त्यांची दुरुस्ती आणि कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








