ICHMH51NEWS.IN
9921600800

हाळवणकरांना पक्षाकडून नेतृत्वाची संधी मिळणारच : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हाळवणकरांना पक्षाकडून नेतृत्वाची संधी मिळणारच : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

इचलकरंजी :
देशातील अनेक राजकीय पक्ष घराणेशाहीला प्राधान्य देतात; मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेतृत्वाची संधी देणारा पक्ष भाजप असल्याने माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना पक्ष निश्चितपणे योग्य संधी देईल, असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.
माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुई फाटा येथील सह्याद्री लॉनमध्ये आयोजित स्नेहमेळावा व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध मान्यवरांनी हाळवणकर यांनी पुन्हा आमदार व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमात वाढदिवस समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
आबिटकर म्हणाले, “हाळवणकर यांचा वाढदिवस हा कार्यकर्त्यांनी लोकोत्सव केला असून त्यांचे नेतृत्व अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.कार्यकर्त्यांना बळ देण्याची त्यांची भूमिका नेहमीच राहिली आहे. राजकारणात चढ-उतार येत असले तरी लोकहिताची भूमिका कायम ठेवून जनतेला न्याय देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.”
खासदार धैर्यशील माने यांनी हाळवणकर यांना बाळासाहेब माने यांच्या कार्यपरंपरेचे खरे वारसदार संबोधले. लोकसभा निवडणुकीच्या काळात उमेदवारीबाबत विविध चर्चा सुरू असताना हाळवणकर यांनी खंबीरपणे पाठिंबा दिल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या तत्वनिष्ठ राजकारणाचे कौतुक केले. “हाळवणकर यांना पुन्हा आमदारकीचा मान मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” असे ते म्हणाले.
खासदार धनंजय महाडिक यांनी हाळवणकर यांचे वर्णन पक्षनिष्ठ, तडजोड न करणारे आणि जमिनीवर काम करणारे नेतृत्व असे केले. “अनेकांना त्यांनी विविध पदांवर संधी दिली; मात्र स्वतःसाठी कधी काही मागितले नाही. पक्षाने दिलेल्या आश्वासनाचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे ते पुन्हा आमदार होईपर्यंत आमचे प्रयत्न सुरू राहतील,” असे महाडिक यांनी सांगितले.
उत्तरादाखल बोलताना सुरेश हाळवणकर म्हणाले, “कार्यकर्त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करणे हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव आहे. या कार्यक्रमामुळे पक्ष, कार्यकर्ते आणि आम्ही सर्वजण नव्या उर्जेने कार्यरत होऊ. पक्षाने मला भरभरून दिले आहे. त्यामुळे पक्षाकडे काही मागण्यापेक्षा पक्षाला काय देता येईल, याचा विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे.”
कार्यक्रमात आमदार सदाभाऊ खोत, राहुल आवाडे, अशोक माने, शशिकला जोल्ले, उपमहापौर अनिल डाळ्या, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, मकरंद देशपांडे, अजित जाधव आणि सुरेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, महापौर उदय धातुंडे, अरुण इंगवले, हिंदूराव शेळके, स्वाती पाटील, नाथाजी पाटील, विजय जाधव, सावकार मादनाईक आदी मान्यवर उपस्थित होते. शशिकांत मोहिते यांनी सूत्रसंचालन केले, तर नगरसेवक तानाजी पोवार यांनी आभार मानले.
माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांचा सत्कार करताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक,खासदार धैर्यशील माने व पदाधिकारी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा