ICHMH51NEWS.IN
9921600800

अवैध आयपीएल बेटिंग रॅकेटमधील दोन मास्टरमाईंड गुजरातमधून अटकेत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अवैध आयपीएल बेटिंग रॅकेटमधील दोन मास्टरमाईंड गुजरातमधून अटकेत

इचलकरंजी :

इचलकरंजीतील अवैध आयपीएल क्रिकेट बेटिंग रॅकेटविरोधात सुरू असलेल्या कारवाईत शिवाजीनगर पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील दोन मुख्य सूत्रधारांना गुजरातमधील सुरत येथून अटक करण्यात आली असून, या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ८७ लाख ५५ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संघटित पद्धतीने अवैध क्रिकेट बेटिंग व्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार विशेष तपास पथकाची स्थापना करून २४ मे रोजी इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील भुवनेश्वरी मंदिरासमोरील मनिषा एंटरप्रायजेस या फुटवेअर गोडाऊनवर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईनंतर तपासादरम्यान या बेटिंग रॅकेटचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक माहितीच्या आधारे विशेष तपास पथकाने गुजरातमधील सुरत येथे शोधमोहीम राबवून जयदिप रमेशभाई जिकाद्रा (वय ३०) व हार्दिक रमेशभाई जिकाद्रा (वय ३२, दोघे रा. बालमुकुंद सोसायटी, पुनागाम, सुरत) या दोघांना ताब्यात घेत अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन मोबाईल फोन, एक टॅब, एक लॅपटॉप आणि एक सीपीयू असा ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात यापूर्वी नऊ आरोपींना अटक करण्यात आली होती. नव्या कारवाईनंतर अटक आरोपींची संख्या ११ वर पोहोचली असून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ८७ लाख ५५ हजार २३० रुपये झाली आहे.

या कारवाईसाठी हुपरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास शिंदे तसेच सायबर पोलीस ठाणे, कोल्हापूर यांचे विशेष सहकार्य लाभले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अवैध बेटिंग नेटवर्कबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी विशेष तपास पथकाकडून सखोल चौकशी सुरू आहे.

पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक विकास शिंदे, पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे, प्रविण साने तसेच विशेष तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा