कृष्णा नदीतून ‘राधाकृष्ण’ पाणीपुरवठा योजना; इचलकरंजीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविणार – आ. राहुल आवाडे
इचलकरंजी:
इचलकरंजी शहराचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कृष्णा नदीतील जुने दानवाड येथील डोहातून ‘राधाकृष्ण पाणीपुरवठा योजना’ राबविण्यात येणार असल्याची घोषणा आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केली. या योजनेमुळे शहराला शुद्ध, मुबलक आणि दीर्घकालीन पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार आवाडे यांनी सांगितले की, २१ मार्च २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर चर्चा झाली होती. त्यावेळी कोणाचाही विरोध होणार नाही अशा पर्यायी स्रोताचा शोध घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, इचलकरंजी महानगरपालिका आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून जुने दानवाड येथील राधाकृष्ण मंदिराजवळील डोहाची निवड करण्यात आली आहे.
या डोहामध्ये उन्हाळ्यातही सुमारे साडेचार मीटर पाणी उपलब्ध राहते. तसेच पुढील बंधाऱ्यामुळे आणि कर्नाटकातून परतणाऱ्या बॅकवॉटरमुळे पाण्याचा साठा कायम राहतो. या ठिकाणाहून सुमारे २६ किलोमीटर लांबीची पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात येणार असून १३ किलोमीटर अंतरावर मोठी जलसाठवण टाकी उभारण्यात येणार आहे. त्यानंतर पंपिंगद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे.
या योजनेसाठी अंदाजे ५५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून संपूर्ण निधी शासनाकडून मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आवाडे यांनी सांगितले. तसेच या योजनेमुळे सैनिक टाकळी, खिद्रापूर, जुने दानवाड व नवे दानवाड परिसरातील शेतीला कोणताही फटका बसणार नसून उलट या गावांनाही याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जुने दानवाड, नवे दानवाड आणि सैनिक टाकळी येथील आजी-माजी सरपंच, विकास सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी, संचालक तसेच इचलकरंजी महानगरपालिका पदाधिकारी संख्येने उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







