ICHMH51NEWS.IN
9921600800

कोल्हापूर प्रवेशकर प्रस्तावाला इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचा विरोध

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोल्हापूर प्रवेशकर प्रस्तावाला इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचा विरोध

इचलकरंजी :
 कोल्हापूर शहरात बाहेरून येणाऱ्या चारचाकी वाहनांवर प्रवेशकर आकारण्याच्या प्रस्तावाला दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने तीव्र विरोध दर्शविला असून याबाबतचे निवेदन कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर व आयुक्त यांना सादर करण्यात आले आहे.
असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर महानगरपालिकेच्या महासभेत शहरात बाहेरून येणाऱ्या चारचाकी वाहनांवर प्रवेशकर आकारणीचा विषय चर्चेस येणार असल्याचे माध्यमांतून समोर आले आहे. मात्र, या निर्णयाचा सर्वाधिक फटका इचलकरंजीसारख्या औद्योगिक शहरातील उद्योजक व नागरिकांना बसू शकतो.
इचलकरंजी हे यंत्रमाग उद्योगासाठी ओळखले जाणारे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून विविध प्रशासकीय कामांसाठी येथील उद्योजकांना वारंवार कोल्हापूरला जावे लागते. जीएसटी कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, महसूल विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आयकर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरण तसेच विविध बँकांची विभागीय कार्यालये कोल्हापूरमध्ये असल्याने ये-जा नियमित सुरू असते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, इचलकरंजी येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू झाल्यानंतर अनेक वाहनांची नोंदणी एमएच-५१ क्रमांकाने होत असल्याने अशा वाहनांवर प्रवेशकर आकारल्यास जिल्ह्यातील नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडेल, अशी भूमिका असोसिएशनने मांडली आहे.
याशिवाय, इचलकरंजीतील नागरिक पर्यटन, वैद्यकीय सेवा तसेच सुट्टीच्या दिवशी कुटुंबासह मोठ्या प्रमाणात कोल्हापूरला भेट देतात. प्रवेशकर लागू झाल्यास नागरिक सांगली, मिरज, निपाणी यांसारख्या पर्यायी शहरांकडे वळू शकतात व त्यामुळे कोल्हापूरच्या व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे असोसिएशनचे मत आहे.
या सर्व बाबींचा विचार करून प्रवेशकराचा विषय महानगरपालिकेच्या महासभेतून वगळण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा