सायकल रॅलीने नवोगतांचे स्वागत; रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनमध्ये ‘प्रवेश उत्सव’ उत्साहात
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिका संचालित रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन क्रमांक २७ येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘प्रवेश उत्सव’ आगळ्यावेगळ्या पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाच्या इंधन बचतीच्या संकल्पनेला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीने कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
शाळेतील इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी नव्याने प्रवेश घेतलेल्या १९८ विद्यार्थ्यांना आपल्या सायकलवर बसवून वाजत-गाजत आणि सन्मानपूर्वक शाळेत आणले. या अनोख्या स्वागतामुळे परिसरातील नागरिकांचेही लक्ष वेधले गेले.
कार्यक्रमास उपमहापौर अनिल डाळ्या, नगरसेविका सुरेखा जाधव, नगरसेवक नितेश पोवार, नगरसेविका स्नेहल रावळ, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, दीपक रावळ तसेच मुख्याध्यापिका अलका शेलार उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांना शासनाच्या मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी शाळेने भावनिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवत नवीन विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे कागदावर घेऊन ती आठवण पालकांना भेट दिली. मुलांच्या शालेय जीवनाच्या पहिल्या पावलाची ही स्मृती पालकांसाठी विशेष ठरली.
तसेच ‘एक मूल, एक झाड’ या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक नवागत विद्यार्थ्यांच्या पालकांना वृक्ष भेट देऊन त्याच्या संगोपनाचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘नशामुक्तीची शपथ’ही घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र घोडके यांनी केले. आभार अजित शेट्टी यांनी मानले, तर सूत्रसंचालन वंदना गतारे यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची मोठी उपस्थिती लाभली.
नवोगतांचे स्वागत करताना पदाधिकारी व शिक्षक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800



