ICHMH51NEWS.IN
9921600800

वरिष्ठ अधिकारी कलावती मिसाळ यांना अटकपूर्व जामीन 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वरिष्ठ अधिकारी कलावती मिसाळ यांना अटकपूर्व जामीन 

इचलकरंजी:
महानगरपालिकेतील महिला व बालकल्याण विभागाच्या कामांमध्ये कथित १३ लाख ७१ हजार रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील लेखाधिकारी कलावती लक्ष्मण मिसाळ यांना इचलकरंजी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
प्रकरणानुसार, २०२१ मध्ये आवळे मैदान येथील बालवाडी दुरुस्ती आणि अंगणवाडी परिसरातील काँक्रीट व पेव्हर ब्लॉकची कामे करण्यात आल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कामे न होता किंवा अपूर्ण असतानाही मोजमाप पुस्तके आणि अधिकृत अभिलेखांमध्ये ती पूर्ण झाल्याच्या नोंदी करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच काही अधिकाऱ्यांच्या सह्या बनावट करून खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली आणि त्याच्या आधारे १३ लाख ७१ हजार ७०२ रुपयांची रक्कम अदा करण्यात आल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
या प्रकरणात पोलिसांनी कलावती मिसाळ यांना नोटीस बजावली होती. मात्र त्यांनी न्यायालयात आपण केवळ लेखा विभागातील अधिकारी असून देयकांची प्रक्रिया करणे हेच आपले काम असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष कामाची पडताळणी करणे ही जबाबदारी आपली नसल्याचा त्यांचा दावा होता. तसेच या व्यवहारातून आपल्याला कोणताही आर्थिक लाभ झालेला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
न्यायालयाने निरीक्षण नोंदविताना म्हटले की, अर्जदार ही ना कंत्राटदार आहे, ना कथित रकमेची लाभार्थी असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. तपासातील बहुतांश पुरावे दस्तऐवजी स्वरूपाचे असून ते आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसेच इतर सहआरोपींना यापूर्वीच जामीन मिळालेला आहे.
या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने कलावती मिसाळ यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र तपासात सहकार्य करणे, पुराव्यांशी छेडछाड न करणे आणि साक्षीदारांवर प्रभाव न टाकणे अशा अटी घालण्यात आल्या आहेत.दरम्यान, सार्वजनिक निधीच्या कथित अपहाराशी संबंधित या प्रकरणात नेमका लाभ कोणाला झाला, खोट्या नोंदी कोणी केल्या आणि या संपूर्ण गैरव्यवहारामागे कोणाचे संगनमत होते, याचा तपास अद्याप सुरू असून पुढील चौकशीत अधिक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा