वादळी महासभेत करमूल्यांकनासाठी त्रयस्थ एजन्सीला मंजुरी; शिवतीर्थ येथे ई-बसस्थानक उभारणीचा मार्ग मोकळा
इचलकरंजी, ता. २५ :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या महासभेत शहरातील मिळकतींच्या चतुर्थ वार्षिक कर आकारणी मूल्यांकनासाठी त्रयस्त एजन्सीमार्फत प्रक्रिया राबविण्याच्या विषयावर जोरदार चर्चा झाली. विरोधकांनी जोरदार आक्षेपानंतरही प्रस्ताव सत्तारूढ गटाने ३५ विरुद्ध १३ मतांनी मंजूर केला. फेरीवाले आणि गाळेधारकांच्या विरोधामुळे चर्चेत आलेल्या शिवतीर्थ परिसरातील दुकान गाळे हटवून तेथे ई-बसस्थानक उभारण्याच्या प्रस्तावालाही बहुमताने मंजुरी देण्यात आली.
महापौर उदय धांतुडे यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे सहा तास चाललेल्या या महासभेत अनेक विषयांवर सत्तारूढ व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली.
महापालिकेकडून दर चार वर्षांनी मिळकतींचे पुनर्मूल्यांकन केले जाते. यंदा मात्र हे काम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांऐवजी नागपूर स्थित बाह्य एजन्सीमार्फत करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला. या विषयावर विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी कोट्यावधी रुपयांच्या संभाव्य खर्चासह विविध आक्षेप नोंदवत प्रशासनाच्या निर्णयावर टीका केली. रणजित जाधव, सचिन राणे आणि मदन कारंडे यांनीही या निर्णयास विरोध दर्शविला.
यावर स्पष्टीकरण देताना आयुक्त पल्लवी पाटील यांनी पुनर्मूल्यांकन म्हणजे करवाढ नसून मिळकतींच्या नोंदी अद्ययावत करण्याची नियमित प्रक्रिया असल्याचे सांगितले.कर वाढीचा अंतिम निर्णय सभागृहाचाच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच त्रयस्त एजन्सीद्वारे सात स्तरांमध्ये प्रक्रिया राबविली जाणार असून यासाठी केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. कर विभागातील अपुऱ्या मनुष्यबळाचाही मुद्दा त्यांनी मांडला. अखेरीस मतदान घेण्यात आले आणि प्रस्तावाला बहुमताने मंजुरी मिळाली.
दरम्यान, शिवतीर्थ परिसरात ई-बसस्थानक उभारण्याच्या विषयाकडे विशेष लक्ष लागले होते. प्रस्तावित प्रकल्पासाठी विद्यमान दुकान गाळे हटविण्यात येणार असल्याने गाळेधारकांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. परिवहन सभापती अरुणा बचाटे यांना घेराव घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
या विषयावर विरोधकांनी गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित केला. काही तांत्रिक बाबींवरही चर्चा झाली. त्यास उत्तर देताना सभापती अरुणा बचाटे यांनी येथे एकावेळी दहा बस थांबू शकतील अशा क्षमतेचे ई-बसस्थानक उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. गाळेधारकांच्या पुनर्वसनाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर विषयास मंजुरी देण्यात आली.
याशिवाय वार्षिक कामांमधील गंभीर त्रुटींचा मुद्दा सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी उपस्थित केला. संबंधित मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी झाली. मात्र चर्चेनंतर कामांची चौकशी करून संबंधिताची बिले थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्टेशन रोडवरील स्वागत कमानीस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठरावही महासभेत मंजूर करण्यात आला. त्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर साखर व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
सभेच्या सुरुवातीला १९ विषय चर्चा न करता मंजूर केल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. महापौर आसनासमोर येऊन घोषणाबाजी झाली.काही काळ शाब्दिक चकमक आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले; मात्र नंतर वातावरण शांत झाल्यानंतर सभा सुरळीतपणे पुढे सुरू राहिली.
ध्रुवती दळवाई यांनी नगरसेवकांना विविध कामांची माहिती वेळेवर मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. अलका स्वामी व रुपा बुगड यांनी स्वच्छतेबाबत सूचना मांडल्या. विठ्ठल चोपडे, रवी रजपूते, तानाजी पोवार, राजू बोंद्रे, सुशांत कलागते, संजय तेलनाडे, उदयसिंग पाटील, रणजित जाधव, अमरजीत जाधव, परवेज गैबान, नंदकुमार पाटील, क्रांती आवळे आणि संगीता आलासे यांनी विविध विषयांवर मते मांडली.
सुळकुड योजनेवर सभागृहात चर्चा नाही
१२ मे रोजी सुळकुड पाणी योजनेच्या पाठपुराव्याचा ठराव महासभेत मंजूर झाला होता. त्यानंतर आयुक्त, महापौर आणि उपमहापौर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पर्यायी योजनेचे सादरीकरण केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सभागृहाच्या ठरावाची अंमलबजावणी अपेक्षित असताना नव्या योजनेच्या निर्णयावर विरोधकांडून कोणतीही ठोस चर्चा न झाल्याने सभागृहात आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







