लव्ह जिहाद अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसंदर्भात चौकशी व कारवाईची मागणी; आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे निवेदन
इचलकरंजी :
इचलकरंजीतील पोवार मळा परिसरात काही मुलांनी अल्पवयीन हिंदू मुलींसंबंधी घडलेल्या आक्षेपार्ह प्रकरणानंतर अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसंदर्भातील घडलेल्या प्रकारची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल, इचलकरंजी यांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) यांना निवेदन देण्यात आले.
संघटनेच्या निवेदनानुसार, स्थानिक नागरिकांकडून परिसरातील घटनांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत भावना निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी तसेच कायद्यानुसार आवश्यक ती कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे हाताळण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. अशा प्रकारच्या तक्रारींवर प्रशासनाने संवेदनशीलतेने लक्ष देऊन संबंधित नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा तसेच परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून चौकशी प्रक्रिया वेगाने राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच चौकशीचा निष्कर्ष समोर आल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका मांडण्यात आली.
यावेळी संघटनेचे जिल्हामंत्री पंढरीनाथ ठाणेकर, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष हत्तीकर, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील, जिल्हा सहमंत्री आनंदा मकोटे, सचिन कुरुंदवाडे, सुनील कांदेकर, किशोर मेटे, अमृत डांगे, शुभम सावेकर, सनातनचे शिवानंद स्वामी, महेंद्र आहिरे, रमेशकुमार जैन, अनंत सातपुते, मनोहर म्हेत्रे तसेच महिला आघाडीच्या हर्षिता शेखावत व साधना डांगे उपस्थित होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांना निवेदन देताना हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







