संभाव्य पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज.
इचलकरंजी
इचलकरंजी शहरात संभाव्य पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची आढावा बैठक घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.
आयुक्त पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्यांचे काटेकोरपणे पालन करावे, आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री व साहित्य सज्ज ठेवावे तसेच सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवाव्यात, असे सांगितले. पुरग्रस्तांसाठी उभारण्यात येणाऱ्या निवारा छावण्यांमध्ये अन्न, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांची कोणतीही कमतरता राहू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पूरप्रवण भागांवर विशेष लक्ष ठेवणे, पाणी साचणाऱ्या ठिकाणांची नियमित पाहणी करणे, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे आणि संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय राखण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. बैठकीस उपायुक्त, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन पथकातील अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना आयुक्त पल्लवी पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








