रस्ते व भुयारी गटाराची कामे तातडीने पूर्ण करा; महापौरांचे मक्तेदारांना निर्देश
इचलकरंजी:
शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक या मार्गावरील विविध विकासकामांची पाहणी करून संबंधित मक्तेदार व अधिकाऱ्यांना कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान गावभाग पोलीस ठाण्यासमोरील भुयारी गटार योजनेच्या कामाची माहिती घेत महापौरांनी मक्तेदार मौला बागवान यांना काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच या ठिकाणापासून महासत्ता चौकापर्यंत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम लवकर पूर्ण करून रस्ता वाहतुकीस खुला करण्याच्या सूचना मक्तेदार कोकरेजा यांना करण्यात आल्या.
निरामय हॉस्पिटल परिसरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. निरामय हॉस्पिटल ते हॉकी स्टेडियमदरम्यान खोदलेला रस्ता तातडीने बुजवून वाहतुकीस खुला करावा, अशा सूचना एलसी इन्फ्रा कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या.
महासत्ता चौकातील नायकवडे हॉस्पिटल परिसरातील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश मक्तेदार पाटणी यांना देण्यात आले. तसेच पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या उघड्या विहिरीला संरक्षण कठडे उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
उपरोक्त सर्व कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर व बाजीराव कांबळे यांना महापौरांनी दिले.
यावेळी नगरसेविका ध्रुवती दळवाई, नगरसेवक नवनाळे, रुबन आवळे, तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







