इचलकरंजी वाहतूक शाखेची दमदार कारवाई; चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त, तीन संशयित ताब्यात
इचलकरंजी :
शहर वाहतूक शाखेने नियमित पेट्रोलिंग आणि वाहन तपासणीदरम्यान चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त करून तीन संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे इचलकरंजी व जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहनचोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.
पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर वाहतूक शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
पहिल्या कारवाईत शिवतीर्थ परिसरात पेट्रोलिंगदरम्यान क्रमांकफलक नसलेली संशयित स्प्लेंडर मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली. चेसिस क्रमांकावरून तपासणी केली असता ती इचलकरंजी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी प्रविण प्रकाश मधाळे व अजित भाऊसो कोळी या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
दुसऱ्या कारवाईत यड्राव फाटा येथे वाहन तपासणीदरम्यान एमएच-०९-बीएन-५४७९ क्रमांकाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त करण्यात आली. ही मोटारसायकल जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील वाहनचोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी इरफान इस्माईल चिकोडे याला ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत एकूण २० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून संशयित व जप्त वाहने पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








