पद्मश्री प्रा.एच.सी.वर्मा यांची श्रद्धा समूहाला सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांना दिला विज्ञान, संस्कार आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश
इचलकरंजी :
देशातील ख्यातनाम भौतिकशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ तसेच कॉन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स या जागतिक कीर्तीच्या पुस्तकाचे लेखक पद्मश्री प्रा. एच. सी. वर्मा यांनी ६, ७ व ८ जुलै रोजी श्री. ए. आर. तांबे संचलित श्रद्धा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, श्रद्धा ऑलिम्पियाड स्कूल आणि रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल, तिळवणी या श्रद्धा समूहाच्या संस्थांना सदिच्छा भेट दिली.
तीन दिवसांच्या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापनाशी संवाद साधत संकल्पनांवर आधारित शिक्षण, सातत्यपूर्ण परिश्रम, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी केवळ पाठांतर न करता विषय समजून घेण्यावर भर द्यावा, नियमित व्यायाम, खेळ आणि निरोगी जीवनशैली स्वीकारून बौद्धिक क्षमता विकसित करावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
प्रा. वर्मा यांनी समाजाप्रती जबाबदारी, चारित्र्य, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचे महत्त्व स्पष्ट करत आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी करण्याचे आवाहन केले. श्रद्धा ऑलिम्पियाड स्कूलमध्ये त्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगांचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण केली. तसेच सोशल मीडियाचा संयमित वापर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा अभ्यासासाठी प्रभावी उपयोग कसा करावा, याविषयी मार्गदर्शन केले.
रॉयल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षेतील गुणांपेक्षा कौशल्य, क्षमता आणि कार्यक्षमता विकसित करण्यावर भर द्यावा, असे सांगितले. शिक्षकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल जागृत ठेवणारे अध्यापन, विश्वासपूर्ण संवाद आणि शिक्षकांची सामाजिक जबाबदारी यावर त्यांनी मौल्यवान विचार मांडले.
भेटीच्या शेवटच्या दिवशी श्रद्धा शिक्षण समूहाचे संस्थापक व अध्यक्ष श्री. ए. आर. तांबे यांच्यासह विविध युनिटचे प्रमुख, प्राचार्य, मुख्याध्यापक, विभागप्रमुख, समन्वयक, शिक्षक व व्यवस्थापन सदस्यांसोबत त्यांची सविस्तर बैठक झाली. यावेळी संस्थेतील शैक्षणिक वातावरण, अध्यापन पद्धती आणि गुणवत्तेचे त्यांनी कौतुक केले. व्यावसायिक स्पर्धेच्या युगातही नीतिमूल्यांवर आधारित शिक्षण देण्याच्या श्री. तांबे यांच्या ध्येयाचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक कौशल्यविकासासाठी देशातील नामवंत शिक्षणतज्ज्ञांची नियमित प्रशिक्षण व मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्याची सूचना केली.
यावेळी श्रद्धा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, श्रद्धा ऑलिम्पियाड स्कूल व रॉयल इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. वर्मा यांच्या प्रेरणादायी भेटीमुळे श्रद्धा समूहातील विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापनाला नवी दिशा, ऊर्जा आणि प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
पद्मश्री प्रा वर्मा यांचे स्वागत करताना ए आर तांबे सर.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.वर्मा सर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









