लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी इचलकरंजी महापालिकेत राज्य आयुक्तांची आढावा बैठक
इचलकरंजी : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी मंगळवारी इचलकरंजी महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली. महापौर उदय धातुंडे यांनी त्यांचे स्वागत केले.
बैठकीत आयुक्त पल्लवी पाटील यांनी पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे महापालिकेकडून नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या ६७ ऑनलाइन सेवांची माहिती दिली. विविध दाखले, परवाने, ना-हरकत प्रमाणपत्रांसह अनेक नागरी सेवा ऑनलाइन उपलब्ध असून त्यामुळे सेवा वितरणात पारदर्शकता आणि गतिमानता वाढल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी लोकसेवा हक्क अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करून प्रत्येक पात्र नागरिकाला विहित कालमर्यादेत दर्जेदार सेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. तसेच नागरिकांमध्ये ऑनलाइन सेवांबाबत जनजागृती करण्यासह सध्या सुरू असलेल्या सर्व ऑफलाइन सेवादेखील टप्प्याटप्प्याने ऑनलाइन करण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेच्या कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनी महापालिकेच्या सर्व ऑफलाइन सेवा बंद करून येत्या काही दिवसांत सर्व सेवा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्याचा प्रस्ताव महासभेसमोर मंजुरीसाठी सादर करण्याचा निर्णय जाहीर केला. बैठकीस राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे अधिकारी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आढावा बैठकीत उपस्थित सुधाकर तेलंग व मनपा अधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





