ICHMH51NEWS.IN
9921600800

राजस्थानातील प्रोसेस हाऊस बंदीचा महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योगावर गंभीर परिणाम; वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची अशोक स्वामी,व आमदार अशोक माने यांची मागणी 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजस्थानातील प्रोसेस हाऊस बंदीचा महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योगावर गंभीर परिणाम; वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची अशोक स्वामी,व आमदार अशोक माने यांची मागणी 

मुंबई,  :
 *राजस्थानातील पाली, बालोतरा आणि जोधपूर येथील प्रोसेस हाऊस प्रदूषणाच्या कारणास्तव बंद असल्याने त्याचे गंभीर पडसाद महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगावर उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी आणि हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांनी आज मंत्रालयात महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.*
बैठकीत राजस्थानातील प्रोसेस उद्योग बंद असल्यामुळे महाराष्ट्रातील कापड उद्योग अभूतपूर्व संकटात सापडल्याची वस्तुस्थिती मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. महाराष्ट्रात उत्पादित होणारे मोठ्या प्रमाणातील ग्रे कापड अंतिम प्रक्रियेसाठी पाली, बालोतरा आणि जोधपूर येथे पाठविले जाते. मात्र तेथील प्रोसेस हाऊस बंद असल्याने तयार झालेले कापड अडकून पडले असून उद्योगाची संपूर्ण साखळी विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या परिस्थितीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील यंत्रमागधारक हवालदिल झाले असून, उद्योगाचे भवितव्य काय होणार, या चिंतेने ते ग्रासले आहेत. अनेक यंत्रमाग उद्योगांना उत्पादन कमी करावे लागत असून काही ठिकाणी यंत्रमाग पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. यंत्रमाग बंद पडल्याने सूताची मागणी घटली असून सूतगिरण्याही आर्थिक अडचणीत सापडत आहेत. परिणामी कापड उत्पादक, व्यापारी, वाहतूकदार, कामगार आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्व घटकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
प्रतिनिधींनी सांगितले की, वस्त्रोद्योग हा लाखो कुटुंबांच्या रोजगाराचा आधार असून सद्यस्थिती कायम राहिल्यास महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटण्याचा धोका आहे. विशेषतः इचलकरंजी, मालेगाव, भिवंडी, सोलापूर,विटा आणि इतर वस्त्रोद्योग केंद्रांतील यंत्रमागधारक व उद्योजक मोठ्या अडचणीत सापडले असून, संपूर्ण महाराष्ट्रातील यंत्रमागधारकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत राजस्थान सरकारशी तातडीने संवाद साधण्याचे आश्वासन दिले. तसेच राजस्थान सरकारमधील संबंधित मंत्री आणि राजस्थानचे मुख्यमंत्री यांना सविस्तर पत्र पाठवून प्रोसेस उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक तो सकारात्मक मार्ग काढण्याची विनंती करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजस्थानातील प्रोसेस हाऊस लवकरात लवकर सुरू होणे ही केवळ राजस्थानची नव्हे, तर संपूर्ण देशाच्या वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे प्रतिनिधींनी बैठकीत नमूद केले. अन्यथा महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगासमोरील संकट अधिक गडद होऊन उत्पादन, रोजगार आणि अर्थचक्रावर दूरगामी परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याशी चर्चा करताना अशोकराव स्वामी व आ.अशोकराव माने
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा