“बोगस बिगरशेती आदेशांच्या आधारे कोट्यवधींचे दस्त? इचलकरंजीतील व्यवहारांची फौजदारी चौकशीची मागणी”
महसूल मंत्र्यांसह पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार; गट क्रमांकांतील व्यवहार रद्द करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
इचलकरंजी :
कबनूर येथील विविध गट क्रमांकांमध्ये खोटे व फेरफार केलेले बिगरशेती (एन.ए.) आदेश तसेच अन्य बनावट कागदपत्रे जोडून खरेदी दस्त नोंदविण्यात आल्याचा आरोप करत विशेष कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र शासन, श्री. दिपक अशोक रावळ यांनी महसूल मंत्री, जिल्हाधिकारी कोल्हापूर, मुद्रांक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि सह दुय्यम निबंधक (क्र. २) इचलकरंजी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, कबनूर येथील गट क्रमांक ७१२, ६७९, ४४१, ६६६, ९२९/अ, ८१३, ७२९/अ आणि ८९९ या जमिनींच्या व्यवहारांमध्ये खरेदी दस्तांसोबत बोगस बिगरशेती आदेश, नकाशा २४ तसेच इतर कथित बनावट कागदपत्रे जोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित बिगरशेती आदेश हे मूळ शासकीय नोंदींशी सुसंगत नसून त्यामध्ये फेरफार करून शासनाची फसवणूक झाल्याची शक्यता असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात संबंधित खरेदीदार, विक्रेते, मुद्रांक विक्रेते, दस्त तयार करणारे टायपिस्ट, साक्षीदार, ओळख देणारे तसेच इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नोंदणी कार्यालय, तहसील कार्यालय आणि महसूल अभिलेखांची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत आणि कथित बोगस कागदपत्रांच्या आधारे झालेले सर्व दस्त व व्यवहार रद्दबातल करावेत, अशीही मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
या तक्रारीसोबत काही खरेदीपत्रांच्या प्रती आणि मूळ बिगरशेती आदेशांच्या प्रती पुरावा म्हणून जोडण्यात आल्याचे श्री. रावळ यांनी नमूद केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






