पंचगंगा नदीत १५ ऑगस्टला रंगणार होड्यांच्या शर्यतीचा थरार.१९७० पासूनची परंपरा यंदाही कायम; श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ व बोट क्लबतर्फे आयोजन
इचलकरंजी :
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ व बोट क्लबच्या वतीने शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४ वाजता पंचगंगा नदीत होड्यांच्या भव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. वरद विनायक मंदिर परिसरात होणाऱ्या या पारंपरिक जलक्रीडा स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून, शहरवासीयांमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सन १९७० मध्ये वरद विनायक भक्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मल्लय्या स्वामी व नारायण भाट यांनी पंचगंगा नदीकिनारी होड्यांच्या शर्यतीची परंपरा सुरू केली. गेल्या ५६ वर्षांपासून ही परंपरा सातत्याने जपली जात असून, यंदाही त्याच उत्साहात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या स्पर्धेला ऐतिहासिक आणि पारंपरिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
वरद विनायक मंदिर भक्त मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. जुन्या परंपरेला आधुनिक स्वरूप देत स्पर्धा अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
स्पर्धेचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते होणार असून, बक्षीस वितरण आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, आमदार अशोकराव जांभळे, जिल्हाध्यक्ष रविंद्र माने, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विजेत्यांना रोख बक्षिसे व चषक
प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास २१ हजार १ रुपये व चषक, द्वितीय क्रमांकास १५ हजार १ रुपये व चषक, तृतीय क्रमांकास ११ हजार १ रुपये व चषक, तर चतुर्थ क्रमांकास ७ हजार १ रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच सहभागी प्रत्येक होडीला एक हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिल्हा शिवसेना (शिंदे गट) अध्यक्ष रविंद्र माने, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पंचगंगा वरद विनायक मंदिर भक्त मंडळ, तृतीय क्रमांकाचे बक्षीस सुवर्णकार के. व्ही. पालनकर, तर चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस माजी उपनगराध्यक्ष महावीर जैन यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
पंचगंगा नदीशी असलेले इचलकरंजीकरांचे जिव्हाळ्याचे नाते आणि शहराची पारंपरिक जलक्रीडा संस्कृती जपण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यंदाही मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होण्याची अपेक्षा असून, १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता पंचगंगा नदीकाठी होड्यांच्या शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






