इचलकरंजी-नाईकबा, इचलकरंजी-चिपळूण एस.टी. सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी
पेठ वडगाव : इचलकरंजी शहरातून वडगाव मार्गे नाईकबा तसेच चिपळूणकडे जाणाऱ्या बंद झालेल्या एस.टी. बससेवा तातडीने पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी इचलकरंजी नागरिक मंचाच्या वतीने करण्यात आली. याबाबत मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. १३) इचलकरंजी आगाराच्या आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले.
या बससेवा बंद झाल्यामुळे नियमित प्रवासी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच धार्मिक स्थळी जाणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः चिपळूणकडे जाणाऱ्या प्रवाशांना थेट बससेवा उपलब्ध नसल्याने पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढण्याबरोबरच अतिरिक्त आर्थिक भारही सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नाईट बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांचीही मोठी अडचण निर्माण झाली आहे. एस.टी. सेवा ही सर्वसामान्यांसाठी सुरक्षित, परवडणारी व विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याने प्रवाशांची गरज लक्षात घेऊन बंद केलेल्या बसफेऱ्या पुन्हा सुरू करणे आवश्यक असल्याचे मंचाने नमूद केले.
इचलकरंजी-वडगाव मार्गे नाईकबा तसेच इचलकरंजी-चिपळूण या दोन्ही मार्गांवरील बससेवा तातडीने सुरू करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. आगार प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही होऊन सेवा लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली.
यावेळी सचिन कांबळे, राजू कोन्नूर, सुहास पाटील, उदयसिंह निंबाळकर, कपिल पाटील, महेंद्र जाधव, अमोल ढवळे, अशोक शर्मा, अनिल ब्याकोड, कपिल ढवळे आदी उपस्थित होते.
निवेदन देताना इनाम सदस्य
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






