NEET 2026 मध्ये 525 हून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार
तिमोर-लेस्टेचे भारतातील राजदूत कार्लिटो नुन्स यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
इचलकरंजी :
श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटतर्फे NEET 2026 मध्ये 525 हून अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. तिमोर-लेस्टेचे भारतातील राजदूत महामहिम कार्लिटो नुन्स यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी त्यांचे शैक्षणिक सल्लागार अनुज गोयल प्रमुख उपस्थित होते.
सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळविलेले यश आणि पालकांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू पाहून कार्लिटो नुन्स भावूक झाले. श्रद्धा इन्स्टिट्यूटने केलेल्या आदरातिथ्याचे कौतुक करत महाराष्ट्रात, विशेषतः इचलकरंजीत उपस्थित राहता आल्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
तिमोर-लेस्टे हा सुंदर, सुरक्षित व शांतताप्रिय देश असून भारतासोबत वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास कटिबद्ध असल्याचे नुन्स यांनी सांगितले. भारतीय विद्यार्थ्यांसाठी तिमोर-लेस्टे हा MBBS शिक्षणाचा उदयोन्मुख पर्याय असून तेथे भारतीय शिक्षक, पुस्तके व भोजन उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक भाषेत परीक्षा देण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा उपयोग समाज व राष्ट्राच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
अनुज गोयल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, मिळालेले यश ही करिअरच्या नव्या प्रवासाची सुरुवात समजावी, असा सल्ला दिला. डॉक्टर हा केवळ औषध देणारा नसून रुग्णाला आशा व विश्वास देणारा असतो, असे त्यांनी सांगितले.
अभिषेक तांबे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. अध्यक्ष ए. आर. तांबे यांनी स्वागत केले. यावेळी संस्था पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजदूतांनी रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल व श्रद्धा ऑलिम्पियाड स्कूलला सदिच्छा भेटही दिली.
सन्मान करताना राजदूत कार्लीटो न्यून्स,आप्पासाहेब तांबे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





