आपटे वाचन मंदिरमध्ये आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
इचलकरंजी, दि. २४ : लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी यांच्या वतीने आणि दि कॉसमॉस को-ऑप. (मल्टीस्टेट शेड्यूल्ड) बँक लि., पुणे यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित राज्यस्तरीय साहित्यसम्राट न. चि. केळकर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी आपटे वाचन मंदिराच्या बजाज सभागृहात उत्साहात पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे पदाधिकारी व परीक्षक यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मधुकर आपटे व अनुपमा जोशीराव यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या अध्यक्ष सुषमा दातार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. परीक्षकांचा परिचय संस्थेचे कार्यवाह प्रा. मोहन पुजारी यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्या सुरभी हळदीकर यांच्या हस्ते परीक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यांचा परिचय संस्थेचे सहकार्यवाह प्रा. डॉ. सुजित सौंदत्तीकर यांनी करून दिला. सुरभी हळदीकर यांचा सत्कार अध्यक्ष सुषमा दातार व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
स्पर्धेच्या निकालात प्रथम क्रमांक न्यू कॉलेज, कोल्हापूरचा संकेत कृष्णा पाटील, द्वितीय क्रमांक श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगलीच्या शांभवी श्रीकांत माळकर, तर तृतीय क्रमांक कला व वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथील भगवंत रामचंद्र कोळी यांनी मिळविला.
उत्तेजनार्थ पारितोषिके एन. एस. पंत वालावलकर ज्युनिअर कॉलेज, देवगडच्या आर्या सत्यवान जोईल आणि कन्या महाविद्यालय, इचलकरंजीच्या सायली विकास पाटील यांना देण्यात आली.
विजेत्यांना प्रमुख पाहुण्या सुरभी हळदीकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या स्पर्धेला कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा व पुणे या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे कार्यवाह प्रा. मोहन पुजारी यांनी केले. यावेळी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष काशिनाथ जगदाळे, संचालक माया कुलकर्णी, माजी संचालक बापू तारदाळकर, दीपक होगाडे यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
पारितोषिक वितरण करताना अध्यक्ष सुषमा दातार,मोहन पुजारी,सुजित सौंंदत्तीकर व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







