ICHMH51NEWS.IN
9921600800

टोकियोमध्ये भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; मल्लखांबाच्या थरारक प्रात्यक्षिकांनी रंगला सोहळा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

टोकियोमध्ये भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; मल्लखांबाच्या थरारक प्रात्यक्षिकांनी रंगला सोहळा

देशभरात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना जपानमधील भारतीय समुदायानेसुद्धा टोकियो येथे हा सोहळा उत्साह, देशभक्ती आणि भारतीय सांस्कृतिक वैविध्याचा सुंदर संगम घडवत दिमाखात साजरा केला. भारत कल्चरल सोसायटी (BCS) जपान आणि संलग्न महिलांची संस्था – तेजोमयी सखी मंच जपान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य भारतीय समुदाय सोहळ्यात भारतीय संस्कृती, कला, क्रीडा, युवा सहभाग आणि सामाजिक एकात्मतेचे प्रभावी दर्शन घडले. “One India. One Community. One Celebration.” या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून फुनाबोरी टॉवर हॉल टोकियो येथे पार पडला. विशेष म्हणजे, महिला आणि युवकांच्या नेतृत्वाखाली नियोजन, आयोजन आणि उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुमारे १०० स्वयंसेवकांनी दोन महिन्यापासून मेहनत घेतली होती.
कार्यक्रमाला मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. जपानमधील भारतीय दूतावासाचे प्रथम सचिव श्री. उमेश नौटियाल तसेच हिंदू स्वयंसेवक संघ, विश्व विभागाचे सह-संयोजक श्री. अनिल वर्तक यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. जपानमधील भारतीय सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचाही कार्यक्रमाला विशेष सहभाग लाभला. मल्लखांब विश्वविजेत्या, मल्लखांब फेडरेशन ऑफ जपानच्या अध्यक्षा केईको ताकेमोतो आणि जपान सिव्हिल डिफेन्स फेडरेशनचे चे संचालक, फेडरेशनचे उपाध्यक्ष तेनकेत्सु कावाहो यांचे व्यासपीठावर विशेष स्वागत करण्यात आले. भारतीय मल्लखांब कलेचा जपानमध्ये प्रसार आणि दोन्ही देशांमधील सांस्कृतिक मैत्री दृढ करण्याच्या दृष्टीने त्यांची उपस्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. जपानमध्ये मल्लखांब लोकप्रिय करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रमुख पाहुणे श्री. उमेश नौटियाल आणि श्री. अनिल वर्तक यांच्या हस्ते या जपानी अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. भारत आणि जपान यांच्यातील सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक संबंधांना अधिक बळकटी देणारा हा क्षण उपस्थितांसाठी विशेष संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमात विविध भारतीय राज्यांच्या संस्कृती, परंपरा आणि कलांचे प्रतिनिधित्व करणारी सांस्कृतिक सादरीकरणे झाली. संगीत, नृत्य, देशभक्तिपर कार्यक्रम आणि विविध कलाविष्कारांनी संपूर्ण सभागृह भारतीय संस्कृतीच्या रंगांनी भारून गेले. कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, भारतीय सांस्कृतिक विविधता, कुटुंबीयांचा सहभाग आणि भारत-जपान मैत्री यांचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. त्यासाठी सान्या ओहरी, स्म्रिती मिश्रा, शिल्पा वैद्य, संध्या जन, अभिनाश साहू, जान्हवी केणे, अंकिता जोग, केना शाह, श्रद्धा पाटील, पूर्वी जोशी, सुप्रिया पाल दत्त अशा जपानमधील लोकप्रिय नृत्य दिग्दर्शकांच्या ग्रुपचे सहकार्य मिळाले.
*भारत-जपान मैत्रीचा सांस्कृतिक सेतू*
भारतीय समुदायाच्या या सोहळ्यात जपानी मान्यवरांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. भारतीय पारंपरिक क्रीडा मल्लखांब, भारतीय संस्कृती आणि देशभक्तीच्या माध्यमातून भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीचा सांस्कृतिक सेतू अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला. उपस्थित मान्यवर, कलाकार, खेळाडू, स्वयंसेवक आणि समुदायातील सदस्य यांच्या सहभागामुळे हा स्वातंत्र्यदिन सोहळा केवळ एक उत्सव न राहता भारतीय समुदायाच्या एकजुटीचे, सांस्कृतिक अभिमानाचे आणि भारत-जपान मैत्रीचे प्रभावी प्रतीक ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी सर्व संस्था, मान्यवर, कलाकार, मल्लखांब खेळाडू, स्वयंसेवक, महिला, युवक आणि संपूर्ण भारतीय समुदायाचे योगदान मोलाचे ठरले. “एक भारत, एक समुदाय, एक उत्सव” या भावनेने साजरा झालेला टोकियोतील हा स्वातंत्र्यदिन सोहळा उपस्थितांच्या मनात देशप्रेम, संस्कृतीचा अभिमान आणि भारत-जपान मैत्रीची नवी ऊर्जा निर्माण करून संस्मरणीय ठरला.
*राष्ट्रीय खेळाडूचे थरारक मल्लखांब प्रात्यक्षिक*
कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील भारतीय मल्लखांब खेळाडू शार्दूल जोशी यांनी सादर केलेलं लाईव्ह प्रात्यक्षिक! भारतीय मातीत शतकानुशतके विकसित झालेल्या मल्लखांब या पारंपरिक क्रीडा-कलेतील ताकद, चपळता, संतुलन, लवचिकता आणि शारीरिक कौशल्याचे अप्रतिम दर्शन प्रेक्षकांना घडले. उंच लाकडी मल्लखांबावर शार्दूलने सादर केलेल्या विविध अवघड आणि थरारक कसरतींना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. शार्दुलचा प्रशिक्षण आणि सरावासाठी जपान दौरा आणि स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा कार्यक्रम यांची सांगड घालून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. शार्दुलच्या चित्त-थरारक आणि रोमहर्षक प्रस्तुतीनंतर त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. शार्दुलचा प्रवास, मल्लखांबाची उपलब्धतता यासाठी फेडरेशनचे संचालक श्री. विवेक साबळे यांचे सहकार्य लाभले. जपानमधील भारतीय समुदायासाठी मल्लखांबाचे हे लाईव्ह प्रात्यक्षिक म्हणजे एक विशेष पर्वणी होती. जपानमध्ये भारतीय समुदायाच्या संस्थेच्या माध्यमातून अशा स्वरूपाचे मल्लखांब प्रात्यक्षिक सादर होणे हा एक विशेष आणि प्रथमच अनुभव ठरला. भारतीय पारंपरिक क्रीडा वारसा जपानमधील नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले.
*डिजिटल ड्रॉइंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद*
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने “Freedom Beyond Borders” या संकल्पनेवर आधारित डिजिटल ड्रॉइंग स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. विशेषतः १८ वर्षांखालील मुलांसाठी आयोजित या उपक्रमातून राष्ट्रीय स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, समानता, शिक्षण, महिला सक्षमीकरण, पर्यावरणीय जबाबदारी आणि डिजिटल स्वातंत्र्य यांसारख्या विषयांवर सर्जनशील विचार मांडण्याची संधी देण्यात आली. कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याच्या मूल्यांचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा अभिनव प्रयत्न ठरला.
*कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी मुले*
जपानमधील भारतीय मुले भारतीय शाळेत जात असली तरी अभ्यासक्रमात त्यांना आपल्या इतिहासाबद्धल मर्यादित माहिती असते शिवाय भारतात होतात तसे विविध कार्यक्रम बाहेर देशात होत नसल्याने मुलांना आपला स्वातंत्र्यसंग्राम माहिती व्हावा, तो आठवणीत राहावा, स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या महान व्यक्तींबद्धल माहिती व्हावी यासाठी छोट्या मुलांना केंद्रस्थानी ठेऊन दरवर्षी या कार्यक्रमाची रूपरेषा बनवण्यात येते.
*संपूर्ण नियोजन युवक आणि महिलांचे*
या संपूर्ण आयोजनात महिला आणि युवकांचा सक्रिय सहभाग हे कार्यक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. नियोजनापासून व्यवस्थापनापर्यंत आणि सांस्कृतिक सादरीकरणापासून विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीपर्यंत अनेक जबाबदाऱ्या महिला आणि युवकांनी प्रभावीपणे पार पाडल्या. परदेशात राहूनही भारतीय संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रीय मूल्यांशी जोडलेले राहण्याची भावना या कार्यक्रमातून प्रकर्षाने दिसून आली. किशोरवयीन मुलांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी, त्यांच्यामध्ये सांघिक भावना निर्माण करण्यासाठी तसेच विविध गुणसंपन्न महिलांना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्धेश्य समोर ठेऊन या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि अंमलबजावणी युवक आणि महिलांनी केली. त्याच अंतर्गत कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालनसुद्धा किशोरवयीन मुलांनीच केले. त्यासाठी BCS जपानशी संलग्नित संस्था तेजोमयी सखी मंच जपान या संस्थेच्या महिलांचे विशेष सहकार्य मिळाले.

जपान मध्ये भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रम साजरा करण्यात आला.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा