ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत गुटख्याच्या साठ्यावर शिवाजीनगर पोलिसांचा छापा; १ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत गुटख्याच्या साठ्यावर शिवाजीनगर पोलिसांचा छापा; १ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी/प्रतिनिधी : महाराष्ट्रात गुटखा व गुटखाजन्य पदार्थांच्या विक्री, वाहतूक व साठवणुकीवर बंदी असतानाही विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत तब्बल १ लाख ९० हजार ४८६ रुपयांचा गुटखाजन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच १५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण २ लाख ५ हजार ४८६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

ही कारवाई शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी दुपारी अडीचच्या सुमारास इचलकरंजी येथील कापड मार्केटमधील बिल्डिंग क्रमांक १० मधील गाळा क्रमांक २७२ येथे करण्यात आली.

या प्रकरणी सतीश दत्तात्रय डांगरे (वय ३६, रा. सोन्या मारुती मंदिरामागे, इंडस्ट्रियल इस्टेट, इचलकरंजी) तसेच जावेद चोकावे (रा. बोरगाव, ता. निपाणी, जि. बेळगाव, कर्नाटक) यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत पान बहार, विमल, तुलसी रॉयल जाफराणी जर्दा, मुसाफिर, बाबा प्रीमियम, मिराज, आर.एम.डी., सिग्नेचर, स्टार, पान पराग, रजनीगंधा, नौरत्न, एम-४, व्ही-१, बी-१, बीएचआर-एस, एक्स-फॅक्टर आदी विविध ब्रँडचे पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम २००६ अन्वये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार गुटखा व गुटखासदृश्य पदार्थांची विक्री, वाहतूक व साठवणुकीस प्रतिबंध असतानाही आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे पदार्थ विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे पोलिसांच्या कारवाईत निष्पन्न झाले.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम गजबरसाब सनदी यांनी फिर्याद दिली. पुढील तपास म.पो.स.ई. साबळे करीत आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा