गणेशोत्सवासाठी महापालिकेची जय्यत तयारी; पर्यावरणपूरक विसर्जनासह मंडप परवाना बंधनकारक
इचलकरंजी :
येत्या १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेने विविध प्रशासकीय यंत्रणांच्या समन्वयातून व्यापक तयारी सुरू केली आहे. गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन, मिरवणूक मार्गांची दुरुस्ती, वाहतूक नियोजन तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मंडप परवाना बंधनकारक करण्यात आला आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनी घरगुती गणेशमूर्तींचे तसेच ६ ते ८ फूट उंचीच्या सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन शहापूर खणीमध्ये करावे, असे आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी शहापूर खणीमध्ये सध्या सुमारे १५ फूट पाणीसाठा उपलब्ध असून विसर्जनासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. आयुक्त पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत खणी परिसराची पाहणी करून स्वच्छता व सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यापूर्वी महानगरपालिकेचा आवश्यक परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंडपामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दल व अन्य अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या स्ट्रीट लाईट किंवा सार्वजनिक बोअरवेलच्या विद्युत कनेक्शनमधून अनधिकृत वीजजोडणी केल्यास संबंधित मंडळावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी बैठकीत आयुक्त पल्लवी पाटील यांनी गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे तसेच विद्युत तारांची आवश्यकतेनुसार उंची वाढविण्याच्या सूचना दिल्या. गर्दीच्या ठिकाणी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीदरम्यान घेतलेले छायाचित्र
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






