ICHMH51NEWS.IN
9921600800

हाळवणकर गटाच्या यु टर्नने घनकचरा निविदेला मंजुरी; विजया महाजन व रविंद्र माने गैरहजर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हाळवणकर गटाच्या यु टर्नने घनकचरा निविदेला मंजुरी; विजया महाजन व रविंद्र माने गैरहजर

इचलकरंजी (प्रतिनिधी) :

इचलकरंजी शहरातील बहुचर्चित घनकचरा व्यवस्थापनाच्या निविदेला अखेर स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. हाळवणकर गटाच्या सदस्यांच्या समर्थनामुळे सुमारे २१ कोटी ९५ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या निविदेचा ठराव मतदानानंतर १० विरुद्ध ४ मतांनी मंजूर करण्यात आला. रोहतक येथील श्री बालाजी केअरटेकर यांना हा मक्ता देण्यात आला असून आठवडाभरात शहरातील कचरा उठाव व स्वच्छतेचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवशाहू आघाडीच्या चार सदस्यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या निविदेस विरोध केला. त्यामुळे हा विषय मतदानासाठी ठेवण्यात आला. यावेळी हाळवणकर गटाच्या समर्थनाने ठराव मंजूर झाला. मात्र, सत्ताधारी आघाडीतील विजया महाजन व रविंद्र माने हे दोन सदस्य सभेस गैरहजर होते.

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कचरा उठावाचा प्रश्न गंभीर बनला होता. अनेक भागांत कचऱ्याचे ढिग साचल्याने नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत होती. निविदेला मंजुरी मिळाल्याने शहर स्वच्छतेचा प्रश्न आता मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.

स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनी निविदेतील तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून आठ दिवसांत कार्यादेश देण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून शहरातील साचलेला कचरा उचलण्यासह नियमित स्वच्छता सुरू करण्याच्या सूचना संबंधित मक्तेदाराला देण्यात येणार आहेत.

दरम्यान, स्थायी समितीने शिवतीर्थ येथे ई-बस स्थानक उभारणी, नवीन बसथांबे व विद्युतीकरण, महापालिका इमारतीची दुरुस्ती तसेच पाच शाळांच्या दर्जोन्नतीसह विविध विकासकामांच्या अंदाजपत्रकांनाही मंजुरी दिली.

विजया महाजन व रविंद माने व विरोधक भूमिकेवर ठाम- अंदाजपत्रक एकत्रित व वाढीव केल्याच्या आरोपाने वातावरण ढवळून निघाले असताना विजया महाजन व रविंद्र माने आपल्या  भूमिकेवर ठाम राहिले, त्यांनी सभेस अनुपस्थित राहण्याचा पवित्रा घेतला तर विरोधकांनी विरोध केला.हाळवणकर गटाच्या त्या ४ नगरसेवकानी मात्र सुरवातीला विरोध केला मात्र आजच्या सभेत समर्थन केल्याने भ्रष्टाचाराचे आरोप कोणत्या वाटाघाटी नंतर थंड झाले याची चर्चा शहरवासीय करत आहेत

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा