ICHMH51NEWS.IN
9921600800

शाहू हायस्कूलचे स्थलांतर तात्काळ स्थगित करा विरोधी पक्षनेते तथा गटनेते उदयसिंग पाटील यांची पत्रकार परिषदेत मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शाहू हायस्कूलचे स्थलांतर तात्काळ स्थगित करा

विरोधी पक्षनेते तथा गटनेते उदयसिंग पाटील यांची पत्रकार परिषदेत मागणी

इचलकरंजी, दि. ११ : इचलकरंजी महानगरपालिकेच्या शाहू हायस्कूलचे चालू शैक्षणिक वर्षात करण्यात येणारे स्थलांतर तात्काळ स्थगित करावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व पालकांची गैरसोय टाळण्यासाठी शैक्षणिक वर्ष पूर्ण होईपर्यंत स्थलांतर करू नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते तथा गटनेते उदयसिंग पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
शाहू हायस्कूल ही इचलकरंजीतील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा जपणारी शाळा असून, या शाळेतून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत यश मिळविले आहे. त्यामुळे शाळेचे स्थलांतर हा केवळ प्रशासकीय विषय नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि पालकांच्या भावनांशी संबंधित विषय असल्याचे पाटील यांनी सांगितले.
शाळेच्या इमारतीचा तळमजला व पहिला मजला सन १९७१ ते १९७४ या कालावधीत, तर दुसरा मजला सन १९८० ते १९८५ दरम्यान बांधण्यात आला आहे. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली यांच्यामार्फत करण्यात आले आहे. या अहवालात इमारतीच्या सुरक्षिततेबाबत नेमके काय नमूद केले आहे, कोणती दुरुस्ती अथवा मजबुतीकरण आवश्यक आहे, याची माहिती पालक व नागरिकांसमोर प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
शाहू हायस्कूलमध्ये सुमारे ५००, तर विद्यानिकेतनमध्ये सुमारे ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे जवळपास ११०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी चालू वर्षात स्थलांतर करू नये, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
शाळेत संगणक लॅब, प्रयोगशाळा, ग्रंथालय, जिम, स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि सुरक्षा व्यवस्था अशा सुविधा उपलब्ध आहेत. नवीन ठिकाणी स्थलांतर करण्यापूर्वी या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
शाळेचे नूतनीकरण आवश्यक असल्यास त्यास विरोध नसून, पर्यायी इमारत किंवा वर्गखोल्यांची व्यवस्था करून त्यानंतर सध्याच्या इमारतीचे नूतनीकरण अथवा पुनर्बांधणी करावी, अशी सूचना पाटील यांनी केली.
यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, नगरसेवक सचिन राणे, शिवाजी पाटील, रतन वाझे उपस्थित होते.
“इमारत पुन्हा बांधता येते; पण विद्यार्थ्यांचे गेलेले शैक्षणिक वर्ष पुन्हा आणता येत नाही. शाळेचे नूतनीकरण करा; मात्र विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालू नका,” असे उदयसिंग पाटील यांनी सांगितले.
स्ट्रक्चरल ऑडिट अजुन एका कंपनीकडून करावे.
स्ट्रक्चरल ऑडिट हे अजून एका कंपनीकडून करून घ्यावे व त्यानंतर निर्णय घ्यावा कारण आता केलेल्या ऑडिटमध्ये तळमजला व पहिला मजला सुस्थितीत असल्याचा अहवाल असून फक्त दुसऱ्या मजल्यावर बांधकाम धोकादायक असल्याचे उदयसिंग पाटील यांनी सांगितले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा