बाहुबली, कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांतील प्रस्तावित विकासकामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
आमदार राहुल आवाडे यांच्या सूचनांनुसार कार्यवाहीचे आदेश
इचलकरंजी : राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत श्री क्षेत्र बाहुबली व श्री क्षेत्र कुंथुगिरी येथे प्रस्तावित असलेल्या विविध विकासकामांची जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आमदार राहुल आवाडे यांच्यासमवेत पाहणी केली. तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांचे नियोजन करून त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आळते येथे पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात पंचकल्याण महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच श्री क्षेत्र बाहुबली येथे दर बारा वर्षांनी भगवान बाहुबली यांचा महामस्तकाभिषेक सोहळा होतो. याठिकाणीही पंचकल्याण महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यांसाठी लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर दोन्ही तीर्थक्षेत्रांमध्ये अंतर्गत रस्ते, स्वच्छता व्यवस्था, पिण्याचे पाणी, सुशोभीकरण, वाहनतळ तसेच भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. या विकासकामांसाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्याकडून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
या पाठपुराव्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, आमदार राहुल आवाडे व प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेट देऊन प्रस्तावित विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी बाबासो चौगुले, डी. सी. पाटील, बाबासाहेब पाटील, तात्या अथणे, गोमटेश बेडगे, अनिकेत चौगुले, सचिन पाटील, सुधीर पाटील, धनंजय टारे, आळतेचे सरपंच अजित इंगवले, शितल हावळे आदी उपस्थित होते.
भेटीदरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी तीर्थक्षेत्रांच्या विकासासंदर्भातील विविध सूचना जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्यानुसार संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. आगामी धार्मिक महोत्सवांच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्जेदार व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, आ.राहुल आवाडे व मान्यवर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






