ICHMH51NEWS.IN
9921600800

जवाहर कारखान्याचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जीवन गौरव पुरस्कार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जवाहर कारखान्याचे संस्थापक कल्लाप्पाण्णा

आवाडे यांना जीवन गौरव पुरस्कार

इचलकरंजी –
हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व विद्यमान चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली या देश पातळीवरील संस्थेकडून जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार सोहळा २२ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमासाठी विविध राज्यातील मंत्री, साखर उद्योगातील प्रतिष्ठीत पदाधिकारी, उद्योजक, तंत्रज्ञ आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कल्लाप्पाण्णा आवाडे यांना यापूर्वी फाय फौंडेशन इचलकरंजी या संस्थेकडून जीवन गौरव, उत्कृष्ट समाजसेवेबद्दल कोल्हापूर येथील आर. जी. गांधी श्रमण संस्कृती साधना या स्वयंसेवी संस्थेकडून समाजभूषण, वस्त्रोद्योग क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनद्वारा वस्त्रोद्योग भूषण तसेच कै. विष्णुआण्णा पाटील जीवन गौरव पुरस्कार, कब्बडी खेळातील योगदानाबद्दल कब्बडी भूषण, किसन वीर साखर कारखान्याच्या वतीने आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार आणि दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली तसेच दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन, पुणे या संस्थेकडून जीवन गौरव, सहकार महर्षि गणपतराव साठे सेवाभावी प्रतिष्ठान माढा या संस्थेकडून जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
आवाडेदादांनी स्थापन केलेल्या जवाहर कारखान्याच्या उभारणीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा कायापालट झाला आहे. हजारो बेरोजगारांना रोजगार, साखर उद्योगाशी संलग्न ऊस तोडणी वाहतूक मजूरांना रोजीरोटी उपलब्ध झाली आहे. आपले संपूर्ण जीवन विधायक कार्यासाठी वेचून आदर्श सहकारी संस्कृतीची जोपासना केलेली आहे. त्याचबरोबर दादांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज् लि. नवी दिल्ली या राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, महाराष्ट्राचे उद्योग, ऊर्जा व नगरविकास खात्याचे मंत्री तसेच लोकसभा सदस्य म्हणून काम केलेचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचबरोबर आवाडेदादांनी वर्ल्ड असोसिएशन ऑफ बीट अॅण्ड केन ग्रोवर या साखर उद्योगाच्या जागतिक संघटनेचे उपाध्यक्ष पदही भूषविले आहे.
जवाहर कारखान्याबरोबरच दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, जनता सहकारी बँक, इचलकरंजी को-ऑप. स्पिनींग मिल या संस्थांचे संस्थापक म्हणून आपले कार्य सिध्दीस नेले आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था, बाहुबली विद्यापीठ, लड्ने एज्युकेशन सोसायटी, देशभूषण शिक्षण संस्था यासारख्या नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेवर आपल्या अनुभवी कार्याचा ठसा उमटविलेला आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा