रोटरी क्लब व डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनतर्फे गरजूंना व्हीलचेअर, तीनचाकी सायकलींचे वितरण
इचलकरंजी :
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने शहर व परिसरातील गरीब, गरजू व्यक्ती व रुग्णांना व्हीलचेअर, तीनचाकी सायकल तसेच व्यायामाची सायकल मोफत वितरित करण्यात आली. हा कार्यक्रम रोटरी श्रीमती सोनीदेवी बाहेती सेवा केंद्र, दाते मळा येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे व श्रद्धा अकॅडमीचे ए. आर. तांबे उपस्थित होते. प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज कोठारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रकल्पाचे चेअरमन मुकेश जैन यांनी उपक्रमाची माहिती दिली, तर मनीष मुनोत यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी बेघर निवारा केंद्रातील गरजू व्यक्तींसाठी सहा व्हीलचेअर, तीनचाकी सायकल तसेच एका व्यक्तीस व्यायामाची सायकल मोफत देण्यात आली. गरजू व्यक्तींना आधार देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, रोटरी क्लब व डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या कार्याबद्दल डॉ. मुळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक कार्य सातत्याने सुरू ठेवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
श्रद्धा अकॅडमीचे ए. आर. तांबे यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमास रोटरीचे अभय येळरुटे, शिवदास कित्तुरे, मनीष मुनोत, सत्यनारायण धूत, मुकुंद माळी, अजित कुरडे, संतोष पाटील, सागर पाटील, नितीन भागवत, संजय घायतिडक, तसेच मुळे फाउंडेशनच्या वृषाली साळी, संजय मुळे, कल्चरल शैक्षणिक इन्चार्ज ॲड. बाबासाहेब निकम, उद्योगपती रमेश जी. पटेल, उज्वल साठे, गुरुकुलचे प्राचार्य गणेश नायकुडे, डॉ. कित्तुरे, उद्योगपती रवी आचलकर, बेघर निवारा केंद्राच्या व्यवस्थापिका उषा येलपले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनंदन देशमुख यांनी केले, तर आभार रोटरी क्लबचे सेक्रेटरी सुनील यळरूटे यांनी मानले.
सायकल वितरण करताना मान्यवर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






