प्रा.शेखर शहा यांनी केला ऑलिम्पिकवीर स्वप्निल कुसाळे यांचा सत्कार
कोल्हापूर : तब्बल ७२ वर्षांनी कोल्हापूरला शूटिंगवीर स्वप्निल कुसाळे याने ५० मीटर पिस्तूल (थ्री पोझिशन) कॅटेगरीमध्ये पॅरिस, फ्रान्स येथील ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ब्रॉंझ मेडल मिळवून दिले. या घटनेने तमाम भारतीयांना तसेच कोल्हापूरवासियांना एक अभिमानाचा क्षण अनुभवायची संधी मिळाली. या यशाबद्दल संपूर्ण कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील सर्वच शासकीय, निमशासकीय, खाजगी घटक मिळून स्वप्निलची दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी भव्य मिरवणूक काढली. छत्रपती ताराराणी पुतळ्यापासून दसरा चौक या मार्गावर स्वप्निल कुसाळे याची अभूतपूर्व अशी मिरवणूक निघाली. विविध सत्कार सोहळे, हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी यासह स्वप्निल कुसाळे याचे कौतुक करण्यात आले. या सोहळ्यामध्ये इचलकरंजीतील ज्येष्ठ क्रीडा संघटक, कोल्हापूर जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष, व डायनामिक्स स्पोर्ट्स इचलकरंजीचे कार्यवाह प्रा. श्री शेखर शहा सर स्वतः सहभागी झाले होते. त्यांनी स्वप्निल कुसाळे यांचा यथोचित सत्कार केला. आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू श्री सचिन चव्हाण, व्हॉलीबॉल संघटनेचे श्री शिवाजी पाटील, कबड्डी प्रशिक्षक श्री रघु पाटील व श्री रवी पाटील उपस्थित होते.
प्रा. शेखर शहा सर हे इचलकरंजी शहर, हातकणंगले तालुका व कोल्हापूर जिल्ह्यातील एक दिग्गज क्रीडा संघटक असून, तालुका ते राष्ट्रीय स्तरापर्यंत कोणताही खेळाडू कोणत्याही स्पर्धेमध्ये यशस्वी झाल्यास त्याचा त्या त्या वेळी सत्कार करणे हा सरांचा कायमचा कार्यक्रम राहिला आहे. तशात ऑलिंपिक स्पर्धेमध्ये स्वप्निल कुसाळे यांनी ब्रॉंझ मेडल मिळवल्याने त्यांचा ऊर अभिमानाने भरून आलेला होता. तेव्हापासून स्वप्निल कुसाळे यांचा सन्मान करावा हे त्यांच्या मनामध्ये घोळत होते. अखेर आज तो क्षण आला आणि अत्यंत भावुकतेने त्यांनी स्वप्निल कुसाळे याचा सत्कार केला व त्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अशाप्रकारे स्वप्निल कुसाळे याची मिरवणूक अत्यंत जल्लोषात व अभूतपूर्व स्वरूपात पार पडली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800