इचलकरंजी महानगरपालिका आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.पाणी व स्वच्छता क्षेत्रात क्लायमेट स्मार्ट युटिलिटीज रेकग्निशन प्रोग्राम अंतर्गत टोरोंटो कॅनडा येथे आंतरराष्ट्रीय गौरव. इचलकरंजी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.पाणी व स्वच्छता क्षेत्रात क्लायमेट स्मार्ट युटिलिटीज रेकग्निशन प्रोग्राम अंतर्गत टोरोंटो कॅनडा येथे आंतरराष्ट्रीय गौरव.
इचलकरंजी
टोरोंटो कॅनडा येथे झालेल्या IWA वर्ल्ड वॉटर कॉग्रेस एक्झिबिशन मध्ये इचलकरंजी महानगरपालिकेला जागतिक स्तरावर नावलौकिक मिळाला आहे. या कार्यक्रमात इचलकरंजी महानगरपालिकेला क्लायमेट स्मार्ट यूटिलिटीज रेकग्निशन प्रोग्राम अंतर्गत पाणी व स्वच्छता क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट उपक्रमांसाठी गौरविण्यात आले आहे. IWA जागतिक जल काँग्रेस आणि प्रदर्शन हे जलचक्राविषयी विविध विषय हाताळणारे एक प्रमुख जागतिक व्यासपीठ आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या शहरामध्ये आयोजन होत असताना, स्थानिक आणि प्रादेशिक पातळीवरील जलसमस्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते.
हा कार्यक्रम हजारो जलतज्ज्ञ, संशोधक, आणि कंपन्यांना एकत्र आणतो. विज्ञान, तंत्रज्ञान, आणि नाविन्यपूर्ण उपायांचा उपयोग करून जलव्यवस्थापनात कसे बदल घडवता येतात, यावर विचारमंचन केले जाते.
काँग्रेस आणि प्रदर्शन भागीदार, प्रायोजक, आणि प्रदर्शक यांच्यात जास्तीत जास्त संवाद घडवून आणते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या संधी, सहकार्य, आणि भागीदारी तयार होतात. तसेच, प्रायोजक व प्रदर्शकांना आघाडीच्या जलतज्ज्ञांमध्ये त्यांची ओळख निर्माण करण्याची संधी मिळते.
आजच्या गंभीर जलसंकटांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय महत्त्वाचे आहेत. IWA प्रकल्प नवोपक्रम पुरस्कार (Project Innovation Awards) या जागतिक पातळीवरील जलसमस्यांवर सर्जनशील उपायांचा सन्मान करतात. या उपक्रमांमुळे मानवी गरजा व पर्यावरणाच्या गरजा संतुलितपणे पूर्ण करण्याच्या दृष्टीने शाश्वत जलव्यवस्थापन साध्य होऊ शकते.
हा कार्यक्रम विचारवंत, निर्णय घेणारे, संशोधक, आणि व्यावसायिकांना एकत्र आणून जलसमस्यांवरील प्रभावी उपायांचा जागतिक संवाद घडवून आणतो.
इचलकरंजी महानगरपालिका व Centre for Water And Sanitation, CRDF CEPT University यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी शहरामध्ये विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. त्या अंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्प येथे एकूण ८१KW सोलार प्रकल्प बसविण्यात आलेला आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या कचरा डेपो शेजारी मियावाकी या जापनीज तंत्रज्ञानावर आधारित अर्बन फॉरस्ट तयार करून तेथे दोन हजार वृक्ष लागवड करणेचे सुरु असून आजअखेर ७५० वृक्षांची लागवड करणेत आली आहे. तसेच महिलांच्या सोयीकरिता सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वितरण व विल्हेवाट मशीन बसविण्याचे प्रस्तावित आहे. येणाऱ्या काळात महानगरपालिकेमार्फत दर तीन वर्षातून एकदा इचलकरंजी शहरातील सर्व मालमत्तांवरील सेप्टिक टाक्या उपसून त्यावर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पावर प्रक्रिया करण्याचे काम नियोजित आहे. तसेच इचलकरंजी महानगरपालिका मार्फत माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी वृक्ष लागवड करणे, जल स्त्रोतांचे पुनुरुज्जीवन करणे अशी इत्यादी कामे करण्यात आलेली आहेत, सदरच्या उपक्रमांमुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होते. सदर अभियानामुळे महानगरपालिकेस स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत ODF++ दर्जा मिळालेला आहे. पाणी व स्वच्छता सेवांमध्ये सुधारणा करताना पर्यावरणाचे रक्षण करण्यावर भर देण्यात येत आहे. या सर्व उपक्रमांमुळे जलस्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन, स्वच्छतेची स्थिती सुधारली असून, हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी शहराने ठोस पावले उचलली आहेत, त्यामुळे आगामी हवामान बदलांच्या आव्हानांचा साम करण्यासाठी शहराची क्षमता वाढली आहे. नुकताच महानगरपालिकेस माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झालेले आहे.
सदरील उपक्रमांमध्ये इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त श्री प्रसाद काटकर, उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील, तत्कालीन उपायुक्त श्री. सोमनाथ आढाव, कार्यकारी अभियंता श्री सुभाष देशपांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, शहर समन्वयक व सर्व अधिकारी – कर्मचारी तसेच CWAS, CEPT University चे डायरेक्टर डॉ. दिनेश मेहता व डॉ. मीरा मेहता, सीनियर प्रोग्राम लीड श्री आसीम मनसूरी व ध्रुव भावस्कर, प्रोग्राम लीड श्रीमती अर्वा भारमल यांच्या योगदानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
इचलकरंजी शहराची निवड सुमारे ४००० शहरामधून झालेली असून या आंतरराष्ट्रीय गौरवामुळे इचलकरंजी शहराची वस्त्रनगरी (महाराष्ट्राचे मँचेस्टर) म्हणून असलेली ओळख जागतिक पातळीवर आणखी ठळक झाली, हा सन्मान सर्व महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी आणि सर्व इचलकरंजीकर नागरीकांसाठी अभिमानाचा क्षण आहे.असे आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More