जैन महामंडळ हे युवकांना उद्योजक बनविण्याबरोबरच समाज विकासाचे माध्यम ठरेल – ललित गांधी
सह्याद्री अतिथिगृहात संचालक मंडळाची पहिली बैठक संपन्न
मुंबई ः महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन स्थापन केलेले जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ जैन युवकांना उद्योजक व रोजगारक्षम बनविण्याबरोबरच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीचे प्रमुख माध्यम ठरेल असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.
जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ च्या सह्याद्री अतिथीगृहातील वसंतदादा पाटील सभागृहात संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या प्रथम बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष मितेश नाहटा, संचालक अरविंद शाह, सदस्य रावसाहेब पाटील, सुनील पाटणी, अल्पसंख्यक मंत्रालयाचे उपसचिव मोईन ताशिलदार, व्यवस्थापकीय संचालक जी.पी.मगदुम, विशेष निमंत्रित हितेशभाई मोता, जैन फेडरेशन चे संदिप भंडारी, दिलीप परमार, महावीर जैन, गोपाल रूणवाल उपस्थित होते.
ललित गांधी यांनी बैठकीला संबोधित करताना सांगितले की, जैन समाजासाठी अशा प्रकारचे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असुन जैन समाजातील विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्वपूर्ण भुमिका महामंडळ बजावणार असुन जैन समाजाच्या विकासातील हे महत्वपूर्ण पाऊल असणार आहे.
या बैठकीत जैन विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण, बेघर लोकांसाठी गृह कर्जाची योजना, व्यापार-उद्योगासाठी सवलतीच्या दरातील कर्ज योजना, शेतकर्यांसाठी विशेषतः समहु शेतीसाठी प्रोत्साहन योजना, जैन साधु-साध्वी विहार व्यवस्था, तीर्थक्षेत्र विकास या विषयी निर्णय घेण्यात आले. तसेच जैन पाठशाला सक्षमीकरणासाठी व विहारधाम निर्माण करण्यासाठी सर्वेक्षण अहवाल बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. नवनिर्वाचित मुख्यमंत्री नाम. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री नाम. एकनाथजी शिंदे, नाम. अजितदादा पवार यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा ठराव ही संमत करण्यात आला.
अल्पसंख्यक मंत्रालयाचे उपसचिव मोईन ताशिलदार यांनी मार्गदर्शन केले. व्यवस्थापकीय संचालक जी.पी.मगदुम यांनी सुत्रसंचालन केले.
सह्याद्री अतिथीगृहात संपन्न झालेल्या जैन आर्थिक विकास महामंडळाच्या प्रथम बैठकीच्या अध्यक्षास्थानी मार्गदर्शन करताना ललित गांधी सोबत संचालक सदस्य व अधिकारी वर्ग

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800