चौथ्या दिवशी विविधरंगी एकांकिकांचे प्रभावी सादरीकरण
इचलकरंजी –
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या २६व्या राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या चौथ्या दिवशी कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, बेळगाव भागातील आठ संघानी विविधरंगी एकांकिका सादर करून रसिकांना निखळ आनंद दिला.
पहिल्या सत्रात देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर या संघाने अजय पाटील लिखित आणि अभिषेक हिरेमठस्वामी दिग्दर्शित ‘यात्रा’ ही सुंदर एकांकिका सादर केली. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी असतात. असाच एका कुटुंबात घडणारा, आयुष्याचे बरेवाईट विविध पैलू दाखवणारा सर्व भावनांचा प्रवास यामध्ये होता. एका वेगळ्या प्रकारच्या विषयावरील दुसरी एकांकिका परिवर्तन कला फाउंडेशन कोल्हापूर या संघाने सादर केली. गंधार जोग यांनी लिहिलेली ‘कलम ३७५’ ही एकांकिका वैष्णवी पोतदार यांनी दिग्दर्शित केली होती. भारतातील झुकत्या कायद्यांवर आणि पुरुषांच्यावरही होणाऱ्या लैंगिक अत्याचारावर या एकांकिकेने भाष्य केले.
त्यानंतर राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बुधगाव या संघाने ‘व्हाय नॉट’ ही प्रबोधनपर एकांकिका सादर केली. अभिषेक पवार व श्रेया माने लिखित आणि दिग्दर्शित या एकांकिकेमध्ये, लग्नापूर्वी मुलीने फिजिकल टेस्टची मागणी मुलाकडे केल्यानंतर त्या दोघांच्या घरात व समाजात घडलेल्या गोष्टींचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर ‘डोन्ट क्वीट’ ही चौथी एकांकिका नाट्यमय पुणे या संघाने सादर केली. लेखक अनिकेत बोले हे होते तर शारदा बवरे यांनी दिग्दर्शन केले होते. एका कुटुंबातील पत्नी सोशल मीडियाच्या आहारी गेल्यामुळे त्या जोडप्याच्या आयुष्यात निर्माण होणारा विसंवाद व दुष्परिणाम यामध्ये दाखविण्यात आला.
दुसऱ्या सत्रात नाट्य आरंभ पुणे व मेगो एंटरटेनमेंट यांनी डॉ. निलेश माने लिखित शोशित (शोधला शिवाजी तर) ही सामाजिक आशयाची एकांकिका सादर केली. सुरज इप्ते यांनी दिग्दर्शन केले होते. आजच्या जगात छत्रपती शिवराय हे आचरणातून हरवलेले आहे त्यांना आचार विचारात शोधण्याची धडपड या एकांकिकेत दिसून आली. त्यापुढील एकांकिका मिलाप थिएटर टुगेदर पुणे या संघाने सादर केली. या एकांकिकेचे लेखन विशाल कदम व डॉ. निलेश माने यांचे होते तर प्रणव जोशी यांचे दिग्दर्शन होते. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील अमेरिकेत गेलेला एक भाऊ आणि गावाकडे असलेला त्याचा भाऊ व कुटुंब यांच्यामधील संघर्षाची तसेच समतोलाची गोष्ट यामध्ये मांडण्यात आली.
चौथ्या दिवशी अखेरच्या सत्रात अंबरेश्वर थिएटर्स अंबरनाथ – ठाणे या संघाने ‘चारू’ ही यामिनी मेस्त्री लिखित व सागर जेठवा दिग्दर्शित एकांकिका सादर केली. डान्स बारमध्ये काम करणाऱ्या पण शिकण्याची इच्छा असणाऱ्या चारूला एक व्यक्ती भेटते आणि तिला मुलगी म्हणून स्वीकारते व तिची इच्छा पूर्ण करते अशा आशयाची गोष्ट यामध्ये होती. शेवटची एकांकिका एसकेई सोसायटीचे आरपीडी महाविद्यालय, बेळगाव या संघाने चांगल्या प्रकारे सादर केली. नितीन सावळे लिखित आणि परसू गावडे दिग्दर्शित हायब्रीड या एकांकिकेत भारतीय शेतकऱ्याची व्यथा मांडण्यात आली. भारत हा कृषीप्रधान देश असला तरी हायब्रीड शेती केल्याने जमिनी आणि कुटुंब व्यवस्थाही नापीक होत आहेत अशी समस्या यामधून परिणामकारकपणे समोर आली. एकूणच या स्पर्धेस इचलकरंजी व परिसर तसेच बाहेरील गावातूनही मोठ्या संख्येने उपस्थित रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रत्येक एकांकिकेस अंदाजे पाचशे सहाशे रसिकांची उपस्थिती ही कला क्षेत्राला प्रोत्साहीत करणारी होती. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सदरची स्पर्धा संपन्न झाली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800