नववर्षाच्या प्रारंभ दिनी सातत्यपूर्ण ग्रंथवाचनाचा संकल्प करूया-ग्रंथ प्रदर्शनावेळी प्रा.सौरभ पाटणकर यांचे प्रतिपादन.
इचलकरंजी ता.१ ग्रंथ वाचन जगण्याचे भान देत असते. एकीकडे भौतिक प्रगती वेगाने होत असून माणूस मात्र माणसापासून दुरावत चाललेला दिसत आहे. अशावेळी मानवी मनोव्यापारांची मांडणी करणारे आणि निसर्ग व मानव यांची ओळख पटवणारे ग्रंथच आपले खरे मित्र ठरतात.ज्ञान आणि रंजन हे दोन्ही हेतू वाचनातून साध्य होत असतात. त्यामुळे समाजवादी प्रबोधिनीचे प्रबोधन वाचनालय नववर्षाचा प्रारंभ वाचन जागरासाठी विविध विषयांच्या ग्रंथांच्या प्रदर्शनातून करत आहे ही एक अतिशय महत्वपूर्ण व अनुकरणीय बाब आहे. त्याचा लाभ साहित्य रसिकांनी घ्यावा. तसेच नववर्षाच्या प्रारंभ दिनी सातत्यपूर्ण ग्रंथवाचनाचा संकल्प करूया.वाचन संकल्प महाराष्ट्राचा या पंधरवड्यामध्ये जास्तीत जास्त साहित्य रसिकांनी प्रबोधन वाचनालयाचे सभासद व्हावे.त्याची सुरुवात मी आज स्वतः वर्गणीदार सभासद होऊन न करतो आहे असे मत प्रा.सौरभ पाटणकर यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्यावतीने नववर्षाचे स्वागत व वाचन संस्कृती विकसित करण्याच्या हेतूने ‘ वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानाच्या निमीत्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करताना बोलत होते.
प्रारंभी प्रा . सौरभ पाटणकर यांच्या हस्ते फीत कापून या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस. आर.रंगनाथन आणि वाचन प्रेरणेचे प्रणेते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा . डॉ.एफ.एम.पटेल यांनी पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. प्रसाद कुलकर्णी यांनी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने १ ते १५ जानेवारी २०२५ हा पंधरवडा ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानाद्वारे राबवला जाणार असल्याचे स्पष्ट करून प्रबोधन वाचनालय हा पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा करणार असल्याची माहिती दिली. तसेच वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी व नागरिक बंधू भगिनींनी शासनमान्य अ वर्ग प्राप्त असलेल्या साहित्याच्या सर्व प्रकारातील बत्तीस हजार पुस्तकांनी व अनेक नियतकालिक आणि समृद्ध असलेल्या प्रबोधन वाचनालयाचे सभासद वाचक व्हावे असे आवाहनही केले. यावेळी सौदामिनी कुलकर्णी ,नंदा हालभावी, रामदास कोळी, शिवाजी शिंदे, सदाशिव फुटाणे, आनंदा जिरगे ,सुशांत शिवशरण, बाबासाहेब बोडके, महादेव भोसले, आर. एम.चाचडी, सूर्यकांत परुळेकर, बाबासाहेब कांबळे ,वीरभद्र हिरेमठ आदि उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800