प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांचे निधन
इचलकरंजी :
माजी प्राचार्य, प्रख्यात साहित्यिक व विद्यावाचस्पती म्हणून ओळखले जाणारे उत्कृष्ट वक्ते श्रीधर शामराव हेरवाडे (वय 87 ) यांचे आज दुपारी इचलकरंजी येथे निधन झाले. शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांची ख्याती होती. सायंकाळी इचलकरंजी येथील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्राचार्य हेरवाडे यांचा जन्म 1938 ला दुधगाव (जि.सांगली) या ठिकाणी झाले. आपले माध्यमिक शिक्षण बाहुबली येथील गुरुकुलात गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या सानिध्यात पूर्ण केले. त्यानंतरचे पुढील शिक्षण त्यांनी कमवा व शिकवा या तत्त्वावरच पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. अनुभव व लौकिकच्या आधारे एक व्याकरण तज्ञ प्राध्यापक म्हणून त्यांनी आपली छाप पाडली. रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेज सातारा मध्ये मराठी विभागात त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर कराड येथील सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज व कोल्हापूर येथील राजश्री शाहू कॉलेजमध्ये त्यांनी काम केले . त्यांनी जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर चे प्राचार्य म्हणून अनेक वर्षे काम केले.
निवृत्तीनंतर अण्णासाहेब डांगे यांनी विनंती करून त्यांची अण्णासाहेब डांगे कॉलेज हातकणंगले येथे मार्गदर्शक प्राचार्य म्हणून तीन वर्षे नियुक्ती केली होती. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व्याख्यानातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर समाज प्रबोधन केले. अनेक विपुल साहित्य, आपल्या रसाळ वाणीतून व लेखणीतून त्यांनी लोकांच्या पर्यंत पोहोचवले आहे. मराठी साहित्यातील व्याकरन तज्ञ, साहित्य निर्माता व रसाळ मांडणी करणारे व्यक्ती अशी त्यांची ख्याती होती. दक्षिण भारत जैन सभेच्या प्रगती आणि जिनविजय, तसेच बाहुबली विद्यापीठाच्या सन्मती या मासिकाचे तर कोल्हापूर येथील लक्ष्मीचे भट्टारक पिठाचे मुखपत्र असलेला रत्नत्रय या मासिकाचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दक्षिण भारत जैन सभेच्या शताब्दी महोत्सव अधिवेशनात त्यांना आचार्य विद्यानंद मराठी साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
गेले काही वर्ष ते इचलकरंजी या ठिकाणी आपल्या मुलगी कडे राहावयास होते. आज दुपारी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पंचगंगा स्मशानभूमीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800