समता वाईन शॉपजवळ वादातून ट्रॅक्टरखाली ढकलल्याने युवकाचा मृत्यू,शासकीय गोंधळात मृतदेहाची त्रेधातिरपीट.
इचलकरंजी
इचलकरंजी येथे समता वाईन शॉपजवळ वादातून झालेल्या घटनेत एका युवकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उत्तम प्रकाश टॉकीज चौक येथे घडली.
विशाल अप्पासो लोकरे (वय २७ वर्षे, रा. संत मळा, इचलकरंजी) असे मयत झालेल्या युवकाचे नाब आहे. विशाल आपला मित्र अनिकेत तोडकर (वय २० वर्षे) याच्यासोबत वाईन शॉपमध्ये पार्सल घेण्यासाठी गेला असताना आरोपी सागर मोहन वाघमारे (वय २९ वर्षे) याने त्याला अज्ञात कारणावरून वादातून मारहाण सुरू केली. दरम्यान, वाद सोडविण्यासाठी काही लोकांनी हस्तक्षेप केला, मात्र सागर वाघमारे व त्याचे साथीदार यश अरुण चौगुले (वय २० वर्षे) आणि संतोष मनोळे (वय २६वर्षे) यांनी विशाल यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली ढकलून दिले.
या घटनेत विशाल याच्या डोक्याला, मांडीला आणि पोटाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर निलेश अप्पासो लोकरे (फिर्यादी) यांच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास अधिकारी पो.नि. प्रमोद शिंदे यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मृतदेहाची त्रेधातिरपीट
मयत विशाल लोकरे यास सुरवातीला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने मध्यरात्री त्याला सांगली सिव्हिलला हलविण्यात आले.उपचारादरम्यान तो मयत झाल्याने सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला,अंत्यविधीपूर्वीचे विधी पूर्ण करून मृतदेह स्मशानभूमीकडे नेत असताना पोलिसांनी संपर्क केला व मयताच्या रक्ताचे नमुने घ्यायचे असल्याचे सांगत मृतदेह इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेला मात्र प्रोटोकॉल नुसार जेथे शवविच्छेदन झाले तेथेच नमुने घेता येतील असे सांगितल्याने परत मृतदेह सांगली सिव्हिलला नेण्यात आला व रक्ताचे नमुने घेऊन मग इचलकरंजीत आल्यानंतर अंत्यविधी करण्यात आले.पोलीस आणि प्रशासनाच्या या प्रकाराने मयताच्या कुटुंबास व नातेवाईकाना मनस्ताप सहन करावा लागला.पोलीस प्रशासनाने कोर्टात गुन्ह्याचे कामकाज चालताना त्रुटी राहू नये यासाठी हे केले असल्याचे सांगत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800