विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक निरीक्षण दौऱ्यात कोल्हापूर पोलीस दलाच्या कार्याचा गौरव
कोल्हापूर
२४ जानेवारी २०२५ कोल्हापूर परिक्षेत्राचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनिल फुलारी यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक निरीक्षणाच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कोल्हापूर पोलीस दलाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आणि त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला.
महानिरीक्षक श्री. फुलारी यांचे स्वागत गार्ड ऑफ ऑनरने करण्यात आले. यावेळी पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना, सहा. सरकारी अभियोक्त्यांना, तसेच गणेशोत्सव मंडळांना प्रमाणपत्रे आणि स्मृतीचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले.
तुकाराम तालीम मंडळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर.कलानगरचा महागणपती, इचलकरंजी.जय शिवराय व्यायाम तालीम मंडळ, सावर्डे दुमाला या गणेश मंडळांना सन्मानित करण्यात आले.
चांगली कामगिरी केलेल्या पोलीस पाटील सौ. तृप्ती प्रदीप जगताप, केली, ता. करवीर,श्री. रविंद्र बापूसो जाधव, हणमंतवाडी, ता. करवीर
तर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांत महाराष्ट्रातील शिवाजीनगर पोलीस ठाणे (प्रथम क्रमांक) आणि शिरोळ पोलीस ठाणे (पाचवा क्रमांक) यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात आले.
त्यानंतर गुन्हे आढावा बैठकीत वर्ष २०२४ मध्ये झालेल्या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याची माहिती पोलिसांनी सादर केली. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित यांनी महिलांविषयक गुन्हे, अवैध धंद्यावर केलेली कारवाई आणि विविध मोहिमांचे सविस्तर विवरण दिले.महानिरीक्षकांनी पोलीस पथकांना मुख्यमंत्री ७ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. याशिवाय दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकारी अभियोक्ता व पोलिसांमधील समन्वयावर भर देण्याचे आवाहन केले.
महानिरीक्षकांनी अंमलदारांचा दरबार घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच,जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पोलीस दलाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट केले.
या निरीक्षण दौऱ्यात पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, ७ उपअधीक्षक, प्रभारी अधिकारी, ३० जिल्हा सरकारी अभियोक्ता आणि २५-३० उद्योजक उपस्थित होते.कोल्हापूर पोलीस दलाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करताना मा. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पोलीस दलाला अभिनंदन दिले व भविष्यातील आव्हानांसाठी तत्पर राहण्याचा सल्ला दिला.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800